आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जिल्ह्यातून २२० बसची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी उस्मानाबाद एसटी विभागाने तयारी केली आहे. यात्रा काळात भाविक प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातून यंदा २२० बसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरीची वारी करणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक जातात. पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसह वाहनांद्वारे जाणारांची संख्याही लक्षणीय असते. तर पायी चालत जाऊन दर्शन घेतल्यानंतर परतीचा प्रवास वाहनांद्वारे करण्यात येतो. त्यामुळे अनेकदा बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. यंदा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उस्मानाबाद विभागाने नियोजन केले आहे. यासाठी तीन-तीन दिवसांचे तीन टप्पे पाडले आहेत. त्यानुसार बस सोडण्यात येणार आहेत. यातील पहिला टप्पा २३ ते २५ जुलैदरम्यान असून, यामध्ये जिल्ह्यातून एकूण १०५ बस सोडण्यात येणार आहेत. २६ ते २८ जुलैदरम्यान १७० बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. तर ३० ते ३१ जुलैदरम्यान एकूण १८० बस सोडण्यात येणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब आणि परंडा हे सहा आगार आहेत. यात्रा कालावधीत या सहा आगारातून एकूण २२० बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पॅसेंजर रेल्वेलाही प्रवाशांची पसंती
उस्मानाबाद येथून पंढरपूर येथे जाण्यासाठी दररोज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास परळी वैजीनाथ- मिरज ही पॅसेंजर धावते. या रेल्वेगाडीची प्रवासी क्षमता सुमारे ७५० पर्यंत आहे. थेट रेल्वेने पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. यात्रा काळात या रेल्वेवर ताण येतो. पंढरपूर यात्रेसाठी विशेष रेल्वे सुरू करावी, अशी मागणी दरवर्षीच होते. परंतु, ही मागणी यावर्षीही पूर्ण झालेली नाही. यात्रेसाठी विशेष रेल्वे सोडल्याने दररोज सकाळी ११.३० वाजता धावणाऱ्या रेल्वेचाच आधार भाविकांना असणार आहे.

महामंडळावर येणार ताण
उस्मानाबाद विभागात यात्रा काळात एकूण ४२६ बस उपलब्ध असणार आहेत. पैकी २२० बस यात्रेसाठी धावणार आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेता या बसही कमी पडतील, असे बोलले जात आहे. शिवाय पंढरपूरसाठीच बहुतांश बस सोडण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात धावणाऱ्या बसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाणार आहे. त्यामुळे यात्रेसाठी खास अन्य आगारातून बस मागवण्याची गरज आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनाची गरज आहे.

ब्रेक-इव्हन लोड फॅक्टरवर भर
यात्राकाळात भाविकांची गैरसाेय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून बस सोडण्यात येतात. काहीवेळा असंख्य बस एकाच मार्गावरून धावत असल्याने सर्वच बस फुल्ल होत नाहीत. बसच्या क्षमतेपेक्षा ७५ टक्केच प्रवाशांनी एखाद्या बसमधून प्रवास केला तर ना नफा तोटा या पद्धतीने बस चालते. अर्थात महामंडळाचा ब्रेक- इव्हन ७५ टक्के लोड फॅक्टरवर आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात लोड फॅक्टर त्यापेक्षा कमी येणार नाही, तसेच महामंडळाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी दिल्या आहेत.

गैरसोय होणार नाही
पंढरपूर वारीसाठी उस्मानाबाद विभागाने नियोजन केले आहे. २३ ते ३१ जुलैदरम्यान बस फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यात्रा काळात १८० ते २२० बस खास पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. भाविकांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येत आहे.'' नवनीतभानप, विभाग नियंत्रक.

- उस्मानाबाद ४७
- उमरगा ३१
- भूम २८
- तुळजापूर ४६
- कळंब ५०
- परंडा १८

बातम्या आणखी आहेत...