आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 दिवसांत 2 लाख छोटे व्यावसायिक कॅशलेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारातील उलाढाल मंदावली असली तरी देशातील छोट्यातील छोटे दुकानदार ‘पेटीएम’च्या सारख्या अॅप्सच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘पेटीएम’ने गेल्या २५ दिवसांत २ लाखहून अधिक विक्रेत्यांना १ लाख रुपयाहून अधिकचे व्यवहार करण्यासाठी माेफत ‘पेटीएम क्यू आर कोड’ दिले आहेत. यामध्ये चहावाला, पानटपरी, लाँड्रीवाले, फळविक्रेते, मटन विक्रेता यांच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे.

नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ग्राहक इंटरनेट बँकिंगसह डेबिट, क्रेडिट, ई-वॉलेट अॅप्सचा वापर करतात. नोटबंदीनंतर ‘पेटीएम’ने छोट्या दुकानदारांना “ई वॉलेट’शी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
यासंदर्भात पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन) दीपक अॅबोट म्हणाले की, नोटबंदीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीही पेटीएमचे काम सुरू होते. व्यावसायिकांना पेटीएमशी जोडण्यात आम्हाला परिश्रम घ्यावे लागायचे. नोटबंदीच्या निर्णयानंतर छोट्या व्यावसायिकांना कॅशलेस व्यवहार करण्यात अडचणी आहेत. त्यांच्या मदतीला पेटीएम अॅप धावून आले.
नोटबंदीचा निर्णय होण्यापूर्वी गेल्या आठ महिन्यांत आम्ही देशात ८.५ लाख व्यावसायिकांसाठी क्यूआर कोड दिले होते, मात्र नोटबंदीनंतर २५ दिवसांत २ लाखांहून अधिक क्यूआर कोड देण्यात आले. लोक स्वत:हून पेटीएम प्रतिनिधींना फोन करीत आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत पेटीएमचे ७०० हून अधिक प्रतिनिधी यासाठी काम करीत आहेत.
विक्रेत्यांसाठी ई-वॉलेट सोयीचे
दुकानदारांना कॅशलेस व्यवहारासाठी डेबीट/क्रेडिट कार्ड स्वॅप मशीन घ्यावे लागते. ही मशीन देणाऱ्या बँकांमध्ये प्रथम १० हजार रुपये भरून चालू खाते काढावे लागते. त्यानंतर ही स्वॅप मशीन मिळते. या मशीनवर महिनाभरात कमीत कमी १५ हजार रुपयांचे व्यवहार व्हायला हवेत. १५ हजारपेक्षा कमी व्यवहार झाल्यास या मशीनचे प्रतिमहिना ५०० ते ७५० रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. याउलट पेटीएमचे अॅप मोफत डाऊनलोड करता येते. शिवाय व्यावसायिकांना आवश्यक असलेले क्यूआर कोड मोफत दिले जातात. केवायसी करणाऱ्या व्यावसायिकांना १ लाखापेक्षा अधिकचे व्यवहार करता येतात.
खेड्यांतून मागणी
- पेटीएमने गेल्या २५ दिवसांत २ लाखांहून अधिक व्यावसायिकांना क्यूआर कोड दिले आहेत. यात ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातील लोकही कॅशलेस व्यवहारासाठी तयार आहेत हे यावरून दिसते. नोटबंदीपूर्वी पेटीएमच्या गेटवेवरून देशात दररोज २२ ते २४ लाखांचे व्यवहार व्हायचे. नोटबंदीनंतर दररोज ५५ ते ५९ लाख रुपयांचे व्यवहार हाेेत आहेत. - दीपक अबोट, वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन), पेटीएम.
बातम्या आणखी आहेत...