आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळजापूरहून परतणा-या भाविकांसाठी 315 बस, मात्र गर्दीपुढे त्‍याही तोकड्याच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तुळजापूरहून परतणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन यंदा एसटी प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. सोलापूर विभागाच्या १४० तर पुणे प्रादेशिकच्या १७५ गाड्या असे मिळून ३१५ गाड्या तुळजापूरहून परतणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्या तरी बस यंत्रणा तोकडीच पडली. शिवाजी चौक येथे वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जुना पूना नाका येथून गाड्यांचे समन्वयन सुरू होते. यंदाच्या वर्षी भाविकांच्या सोयीसाठी पूना नाका येथून महापालिकेच्या बसेसची व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रवाशांना चालत जावे लागले नाही. 
 
कोजागरी पोर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या रात्री भाविक पायी तुळजापूरला जातात. यंदा सकाळपासूनच भाविक जात असल्या कारणाने मंगळवार दुपारपासूनच एसटीला गर्दी वाढू लागली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत एसटी गाड्यांना तोबा गर्दी होती. प्रवाशांना गाडीत बसता येत नसल्याने अनेकांनी एसटीच्या टपावर बसूनच प्रवास केला. तर काही चालकांनी प्रवाशांनी टपावर बसून धोकादायक प्रवास करू नये या करिता काटेरी झुडपाची फांदी लावली होती. 
 
यंदा चांगला प्रतिसाद 
यंदाच्या वर्षी भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला. किती प्रवाशांनी प्रवास केला हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. मात्र गर्दी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी जास्त होती. 
- अश्वजित जानराव, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर 
बातम्या आणखी आहेत...