आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेशसाठी 400 रुपये अनुदान, बँक खाते उघडायला लागतात 500 रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून करण्यात येते. यावर्षीपासून राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही गणवेशाच्या अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आलेली नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील एकूण एक लाख ५५ हजार ३११ विद्यार्थी अजूनही नव्या गणवेशाविनाच आहेत. शिक्षकांनी बँक खाते उघडण्याचे आदेश दिल्यानुसार माढा शहरासह तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांची खाती उघडण्यास गर्दी कायम आहे. चारशे रुपयांच्या गणवेश अनुदानासाठी पालकांना ५०० रुपये भरून बँक खाते काढावे लागत आहे. माढा तालुक्यात १४ हजार ४३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांनी बँकेत खाती उघडली आहेत. मात्र गणवेश अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आली नसल्याने गरीब परिस्थितीत विद्यार्थी जुन्याच गणवेशावर शाळेला जाताना दिसत आहेत. काही पालकांनी शासनाच्या अनुदानाची वाट पाहता उसनवारीने पैसे घेऊन आपल्या मुलांना गणवेश खरेदी करुन दिला आहे. 

गणवेश अनुदानासाठी मुलाचे आई किंवा वडिलांचे जाॅईंट खाते उघडण्याचे आदेश शासनाकडून शिक्षणाधिकारी यांना आल्यानुसार गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना असे आदेश दिले. बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी दिवसभराची कामे सोडून पालक बँकांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. आता शाळा सुरू होऊन एक महिना लोटून गेला तरीदेखील पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शासनाने यावर्षीपासून सुरू केलेल्या गणवेश अनुदानाचा फज्जा उडाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वाधिक गर्दी बँक ऑफ इंडियाच्या शाखेत विद्यार्थी करीत आहेत.तालुक्यात एकूण ३०५ शाळा आहेत. 

बँकेत खाते उघडायचे असेल तर खात्यात पाचशे रुपये टाकणे, असा अलिखित नियम बँकांनी काढल्याने पाल्यांच्या आई वडिलांना बँकेत ५०० रुपये भरूनच खाती उघडावी लागत आहेत.यामुळे आधीच संकटात सापडलेल्या गोरगरीब शेतकऱ्याचे ५०० रुपये बँकेत अडकून पडले आहेत. यामुळे बँकानी झीरो बॅलन्सवर खाते उघडावे, अशी मागणी आहे. ज्यामुळे गोरगरीब पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड पडणार नाही. 

बँकांना झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणार आहे. आतापर्यंत ६० टक्के विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले आहे. त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना पाठवली आहे. 
- मारुती फडके, गटशिक्षण अधिकारी माढा 

अनेकवेळा बँकेतवडिलांना घेऊन गेलो. मात्र पाचशे रुपयांशिवाय खाते उघडता येणार नाही, असे बँक अधिकारी यानी सांगितल्यानुसार पैसे भरून खाते उघडले खरे पण पैशाची वाट पाहत बसलो आहे. जुनाच गेल्यावर्षीचा गणवेश वापरत आहे. 
- स्वागत शिंदे, विद्यार्थी.
 
गणवेशाचे अनुदानआम्हाला मिळालेले नाही.गेल्या एक महिन्यापूर्वी बँकेत खाते उघडले आहे.शिवाय राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये बंधनकारक आहेत. ही अट काढून झीरो बजेटवर खाते उघडावे.यामुळे आमचे पैसे बँकेत पडून आहेत. 
- वासुदेव लोंढे, चिंचोली, ता.माढा, पालक 

अनुदानासाठी किचकट प्रकिया 
गटशिक्षण अधिकारी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या खात्यावर पैसे टाकतील. त्यानंतर मुख्याध्यापक पालकांनी खरेदी केलेल्या गणवेशाची पावती पाहूनच संबंधित पालकांना मुख्याध्यापक गणवेशाचे अकाउंट पे चेक देणार आहेत. 

मिळणारी रक्कमदेखील तुटपुंजी 
दोन गणवेश खरेदी करण्यासाठी शासनाकडून चारशे रुपये मिळणार आहेत. पाचवी ते सातवी या वर्गातील मुलास ड्रेस दोनशे रुपयात मिळेल असे शासनाला वाटतेे. एकाच ड्रेसला ४९० रुपये लागतात. मग दोन ड्रेस चारशेत कसे शक्य आह? 
बातम्या आणखी आहेत...