आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेसाठी 68 टक्के मतदान, रात्रीपर्यंत मतदान सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २१)  आगळगाव (ता. बार्शी) येथील किरकोळ प्रकार वगळता चुरशीने मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांवरील ३२१ आणि पंचायत समित्यांच्या १३६ जागांवरील ५०३ जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होईल.
 
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने आणि दुपारी चारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते, तर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला. विशेष म्हणजे सुगीमुळे शेतीची कामे सुरू असल्याने मतदान चांगल्या प्रकारे होईल का, याविषयी साशंकता होती. तरीही जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले.
 
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. सर्वच तालुक्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने स्थानिक आघाड्या केल्या आहेत. काही ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. यासाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली.
 
काही ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदारांत उत्साह नव्हता. मात्र, बहुतांश गावांमध्ये सुगीच्या कामांमुळे सकाळच्या सत्रात मतदारांनी केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. शेतातील कामे आणि वाढते ऊन यामुळे दुपारी बारानंतर मतदानाचा वेग ओसरला. परंतु दुपारी तीननंतर मतदारांच्या केंद्रासमोर लांब रांगा लागल्या. दरम्यान, मतदान करवून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. त्यासाठी वाड्यावस्त्यांवर त्यांची धावपळ सुरू होती.
 
आगळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल व भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत समर्थक आमने-सामने आल्याने तणाव वाढला होता. यावेळी किरकोळ वादावादी झाली. कुर्डू (ता. माढा) येथे बीएलओने नाव मतदार क्रमांक देण्यास विलंब केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही मतदार रांगेत उभे राहिले. अनेकांनी वाट पाहून घरचा रस्ता धरला. 

अकाेले खुर्द (ता. माढा), खोमनाळ (ता. मंगळवेढा), कासेगाव (ता. पंढरपूर), पेनूर, देवडी (ता. मोहोळ), विजयनगर, आनंदनगर (ता. माळशिरस) येथे मतदानयंत्रे बंद पडली. काही ठिकाणी मतदान झाले होते. येथे यंत्रे बदलल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. मात्र, खोमनाळ येथे रात्री नऊपर्यंत मतदान सुरू होते. आधी मतदान झालेले असल्याने मतदान केलेल्या मतदारांना पुन्हा शोधून त्यासाठी आणावे लागले. एकुरके (ता. मोहाेळ) येथील मालन चव्हाण या ११४ वर्षीय महिलेने मतदान केले. 

मतदारयाद्यांत घोळ : उत्तरसोलापूर तालुक्यात मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदान करता निघून गेले तर अनेकांना उशिरापर्यंत थांबावे लागले. विझोरी (ता. माळशिरस) येथे राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर चुना लावल्याचा प्रकार घडला. तक्रारीनंतर हे यंत्र बदलण्यात आले. 

वृद्ध मतदारांसोबत अधिकाऱ्याचे मतदान ?
दक्षिण वडगाव (ता.करमाळा) येथे वृद्ध मतदारांसोबत जाऊन मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव गायकवाड यांनी केली. त्यांना अटकाव केल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची दमदाटी करण्यात आली. तसेच गुंडांकरवी मार देऊ, असा दम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी दिव्य मराठीला सांगितले.
 
तालुकानिहाय आकडेवारी
करमाळा ६५.७२, उत्तर सोलापूर ६४, बार्शी ७०.७४, मोहोळ ६८.९६ (जिल्हा परिषद), ६७.२२ (पंचायत समिती), माळशिरस ६९.२९, अक्कलकोट ५९.६७, करमाळा ६५.७२, सांगोला ६९.२५, माढा ६९.५, दक्षिण सोलापूर ६५, मंगळवेढा ६६.५३.
बातम्या आणखी आहेत...