आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखर्डे येथे द्राक्षवेलीच्या कांड्यांना औषध लावताना 7 जणांना विषबाधा, एकाची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- जामगाव(पा) येथे शनिवारी छाटणीनंतर द्राक्षबागेतील कांड्यांना औषध लावताना चिखर्डेच्या सात तरुण मजुरांना त्वचेद्वारे विषबाधा झाली. एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला सोलापूरला हलवले आहे. सहा तरुणांवर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू अाहेत. शेतकऱ्यांच्या विषबाधेच्या घटनांनी राज्यभरात चिंतेचे वातावरण असतानाच तालुक्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान, औषधाची प्रतिलिटर मात्रा प्रमाणापेक्षा अधिक वापरल्यामुळेच त्याची तीव्रता वाढून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आनंद नानासाहेब माने असे प्रकृती चिंताजनक असलेल्याचे तर तानाजी मोहन देठे , किरण मधुकर म्हसेकर, दत्तात्रय तुळशीदास चव्हाण, अक्षय हनुमंत सवणे, सागर जनार्धन सुतार, बापू बाबू ढवारे (सर्व रा. चिखर्डे) अशी अन्य मजुरांची नावे आहेत. 

सध्या द्राक्षबागांच्या छाटणीनंतर कांड्यांना औषध लावण्याची कामे सुरू आहेत. हिंगणी येथील आनंद मधुकर काशीद यांची १९ एकर द्राक्षबाग अाहे. त्यांच्या जामगाव (पा) येथील द्राक्षबागेत कांड्यांना औषध लावताना ते अंगावर पडल्याने ही विषबाधा झाली. शुक्रवार आणि शनिवारी दिवसभर काम करून १० ते ११ तरुण चिखर्डेला परतले. सायंकाळी एकाला त्रास होऊ लागला. चक्कर येऊ लागल्यामुळे त्याला येथे आणले. त्यानंतर रात्री इतर सहा तरुणांना त्रास सुरू झाला. रविवारी सकाळी त्यांनाही रुग्णालयात दाखल केले. एकाच्या अंगावर फोड आले आहेत. 

दरम्यान, स्थानिक कृषी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळीही भेट दिली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही रुग्णांची विचारपूस केली. नातेवाईक, ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता तालुक्यातील कृषी औषध विक्रेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. 

हायड्रोजनसायनामाईड, निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक वापर 
द्राक्षबागायतदारशेतकऱ्याचा जबाब घेतला आहे. त्याने प्रतिलिटर ५० मिली या प्रमाणे औषध वापरले असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी अण्णासाहेब साठे यांनी सांगतिले. प्रतिलिटर पाण्यात १५ मिली असे याचे प्रमाण असायला हवे. कृषी अधिकाऱ्यांच्या मतानुसार मर्यादेपेक्षा अधिक औषधाचा वापर केल्याने ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. कारण यात हायड्रोजन सायनामाईड हा घटक असतो. द्राक्षबागेच्या कांड्यांवरील डोळे चांगल्याप्रकारे फुटावेत यासाठी हे आैषध लावले जाते. 

आम्हाला कामाचा अनुभव आहे. इतर गावातही अशी कामे केली आहेत. शनिवारी हातमोजे, तोंडाला कापड बांधून काम केले. हात वर करून काम करावे लागत असल्याने औषध अंगावर ओघळले. औषध कडक असल्याचे द्राक्ष मालक म्हणत होते. 
-प्रताप आगलावे, शेतमजूर, चिखर्डे, ता.बार्शी 

मी शेतकामांचा ठेका घेतो. मजुरांना अशा कामाचा अनुभव आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रतिलिटर औषधाची मात्रा जास्त वापरल्याने त्याची तीव्रता वाढून ही घटना घडली असावी. 
- संभाजीघावटे, गुत्तेदार, कारी 

१३ आॅक्टोबरचे मजूर दुसऱ्या दिवशी कामावर नव्हते. या तरुणांना अशा कामाचा अनुभव नव्हता. याबाबत मी गुत्तेदारालाही बोललो होतो. तरीही त्याने त्यांच्यामार्फत काम करून घेतले. हातमोजे, मास्क वापरून स्टूलवरून काम करा, औषध लावताना काळजी घ्या, असे त्यांना सांगितले होते. 
-आनंद काशीद, द्राक्ष बागायतदार, हिंगणी 

ते औषध सीलबंद केले. रिकामे डबे ताब्यात घेतले. हे काम करताना वापरलेल्या औषधाची विक्री थांबवली आहे. तपासणी करून योग्य कार्यवाही केली जाईल. 
- अनिल कांबळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...