आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 लाखांचा घोटाळा झालेल्या पतसंस्थेत प्रशासकच येत नाही, सहकार खाते नाचवते कागदी घोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणेशपेठेतील हिंगुलांबिका नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त झाले. नऊ महिन्यांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती झाली. परंतु अद्याप त्याचा पत्ता नाही. या संस्थेत सुमारे ७० लाख रुपयांचा घोटाळा झाला. ठेवीदाराच्या रकमा अडकल्या. कारवाईसंदर्भात सहकार खाते नुसतेच कागदी घोडे नाचवते आहे. 

या पतसंस्थेत संचालकांनी मनमानी करून कर्जे वाटली. त्याची वसुली झाली नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या रकमा अडकून पडल्या. संतप्त ठेवीदारांनी गेल्या वर्षी संस्थेत तोडफोड केली. त्यानंतर तत्कालीन शहर उपनिबंधक प्रियांका गाडीलकर यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी प्रशासक म्हणून लेखापरीक्षक पी. के. कोल्हे यांची नियुक्ती केली. त्यांनी आजतागायत पदभार घेतलेला नाही. दरम्यान, गाडीलकर यांची बदली झाली. त्यांच्या जागी कुंदन भोळे आले. त्यांच्याकडेही ठेवीदारांनी पाठपुरावा केला. त्यांनी कागदी घोडे नाचवण्याशिवाय दुसरे काम केले नाही, असे ठेवीदार म्हणाले. 

शहर उपनिबंधकांना थेट प्रश्न 
कुंदनभोळे, शहर उपनिबंधक, सहकारी संस्था 
 
प्रश्न: हिंगुलांबिका पतसंस्थेवर प्रशासक का येत नाही? 
-संबंधितांना पत्र दिले. पुणे विभागीय सहनिबंधकांनाही कळवले. 

प्रश्न: पण नऊ महिने झाले तरी कारवाई का नाही? 
-वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला. आम्हालाही काळजी आहे. 

कार्यालयाचे शटर बंद, नाव पुसले 
गणेशपेठेतील हिंगुलांबिका मंदिराच्या जवळ असलेल्या संस्थेच्या कार्यालयाचे शटर बंद असून, त्याचे नाव पुसले आहे. आता ठेवीदारांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. ठेवीदारांनी मिळून शहर उपनिबंधक कार्यालयासमोरच उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 

मंत्र्यांपर्यंत तक्रारी पण, दखल नाही 
संस्थेतील ठेवी मिळवून देण्याची मागणी घेऊन सहकारमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, शहर उपनिबंधक यांच्याकडे अनेक चकरा घातल्या. बघतो, करतो या आश्वासनाशिवाय दुसरा शब्द मिळाला नाही. पती आजारी असल्याने ठेवीच्या व्याजावरच उपजीविका होती. खायला, आैषधांना पैसे नाहीत. कुटुंबासह घेऊन शहर उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही. -सरोजा महिंद्रकर, ठेवीदार 
बातम्या आणखी आहेत...