आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची दशा: उस्मानाबादेत अर्ज 80 हजार, लाभार्थी शेतकरी 58

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - दिवाळी गेली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था कायम आहे. जिल्हा बँकेअंतर्गत ८० हजारावर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले. आठवडाभरापूर्वी पहिली ५८ जणांची ग्रीनलिस्ट जाहीर झाली. मात्र, त्यातही अनेक चुका असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन जणांना तर अधिकच्या रकमेला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, दोघांना कमी रक्कम मंजूर झाली आहे. 
 
दोन महिन्यांपासून सुरू असलेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा घोळ अद्याप मिटलेला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अगोदर अर्ज भरण्यासाठी त्यानंतर, अर्ज पोहचला का पडताळण्यासाठी चकरा मारल्यानंतर सध्या शेतकरी ग्रीनलिस्ट कर्जमाफीची रक्कम खात्यावर केव्हा जमा होणार याची पाहणी करण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवताना दिसत आहे. त्यातच, “आम्ही करून दाखवल्याचे’ श्रेय घेण्याच्या प्रयत्नात दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधीक स्वरूपात २५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र विशेष सभारंभाचे आयोजन करून वितरीत करण्यात आले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातीलही २३ शेतकऱ्यांचा समावेश होता. परंतु, दोनच दिवसांमध्ये जाहीर झालेल्या ग्रीनलिस्टमध्ये यापैकी एकही शेतकरी नसल्याने प्रशासनासह सरकारवरही मोठी नामुष्की ओढावली. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्हा बँकेकडे ऑनलाइन अर्ज केलेल्या हजारो अर्जापैकी केवळ ५८ जणांची पहिली ग्रीनलिस्ट जाहीर करण्यात आली. परंतु, या यादीतही अनेक चुका असल्याने आठवडाभरापासून जिल्हा बँकेकडून पैसे वाटप झालेले नाहीत. अवघ्या ५८ जणांच्या यादीसाठी जिल्हा बँक मेटाकुटीला येत असताना उर्वरित ८० हजारापैकी किमान २५ हजार अर्जजरी ग्रीनलिस्टमध्ये आले तर त्यातील चुकांची पडताळणी करताना जिल्हा बँकेची काय परिस्थिती असेल हा विचार केलेलाच बरा. 
 
भरले अर्ज ८०८५५ जणांनी पहिली यादी ५८ जणांची 
जिल्हा बँकेच्या एकूण शंभरावर शाखांतर्गत येणाऱ्या कर्जदार ८० हजार ८५५ शेतकऱ्यांनी आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्या सर्वांची माहितीही जिल्हा बँकेने व्यवस्थित भरून शासनाकडे पाठवली. परंतु, त्यापैकी पहिल्या ग्रीनलिस्टमध्ये केवळ ५८ शेतकऱ्यांसाठी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले. यापैकीही अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने बँक बेजार झाली आहे. 
 
आजपासून खात्यावर रक्कम जमा होणार : आलेल्या अडचणीवर चार दिवसांच्या पडताळणीनंतर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी ५३ जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. रक्कमेबाबत अडचण असलेले नावे वगळून उर्वरित ५३ जणांच्या खात्यावर मंगळवारीपासून पैसे जमा होण्यास प्रारंभ होणार आहे. 
 
पाच जणांना कर्जापेक्षा जास्त किंवा कमी मिळाली कर्जमाफी 
जिल्हा बँकेच्या ग्रीनलिस्टमधील ५८ शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने त्या पडताळणी करून सुधारण्यात आल्या आहेत. परंतु, गंभीर बाब म्हणजे जणांना त्यांच्या कर्जापेक्षा जास्त किंवा कमी कर्जमाफी होऊन रक्कम आल्याने ती वितरीत कशी करायची असा प्रश्न बँकेसमोर पडला आहे. 
बातम्या आणखी आहेत...