आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० कोटींच्या रस्ते भूमिपूजनाचा धडाका, कामे पावसाळ्यानंतरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुख्यमंत्री विशेष निधी, नियाेजन समिती व केबल खोदाई पोटी महापालिकेस मिळालेल्या पावणे तीन कोटींसह सुमारे ४० कोटींच्या रस्ते विकास कामांचा शहरात धडाका सुरू आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचे सोहळे रंगत असले तरी ७ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्याने रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइनची कामे करता येणार नाहीत. शासन निर्देशानुसार साधारण आॅक्टोबरमध्येच रस्त्यांची ही कामे सुरू होतील.


शासनाच्या निधीतून कामे प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न 
मुख्यमंत्री विशेष निधीतून सोलापूर शहरात २५ कोटींची कामे करण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समिती व मनपा निधीतून ७ कोटी असे सुमारे ४० कोटींची कामे मंजूर अाहेत. टेंडरिंग प्रक्रिया राबवून मक्तेदारांना काम सुरू करण्याची कालमर्यादा घालून वर्क आॅर्डरही दिली अाहे. 


पावसाळ्यात रस्ते काम केल्यास कामाच्या दर्जाचा मुद्दा निर्माण होतो. पाइपलाइन, ड्रेनेज कामांसाठी खड्डे खोदल्यास तेथे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवितहानी पोहचू शकते. 


हे धोके अोळखून शासनाने पावसाळ्यात रस्ते विकासाची कामे करण्यावर चार महिने निर्बंध घालण्यात अाले अाहेत. महापालिकेच्या वतीने कामे केले जात नाहीत, अशी ओरड चालू असताना शासनाच्या निधीतून सत्ताधारी भाजप रस्ते कामे करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. 


ओएफसीसाठी रस्ते खोदाई 
शहरात ओएफसी केबल घालण्यासाठी रिलायन्स व एअरटेल या दूरसंचार कंपनीच्या वतीने सुमारे ६२ कि.मी.च्या रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाईपोटी रिलायन्स कंपनी ८१ लाख तर एअरटेल कंपनी १.१७ कोटी रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत. याशिवाय महावितरणच्या वतीने सरस्वती चौक परिसरात खोदाई काम सुरू केले अाहे. या मोबदल्यात महावितरणनेही मनपाकडे रक्कम जमा केली अाहे, त्यातून रस्ते विकासाची कामे होतील. ओएफसी केबल खोदाई कामास महापालिकेने परवानगी द्यावी, असा शासनाचा आदेश असल्याने पावसाळ्यात मान्यता देण्यात आली. रस्ते पूर्ववत करून द्यावेत, अशी त्यांना अट घातली आहे. 


शहरात कामे 
मुख्यमंत्री विशेष निधी - २५ कोटी 
ओएफसी केबल अनुदान कामे - २.५ कोटी 
मनपा भांडवली कामे - ७ कोटी 
नियोजन समिती - ६ कोटी 


नागरी वस्ती नाही तेथे रस्ता कसा? 
नगरोत्थान योजना अंतर्गत विजापूर रोड परिसरात लोक राहत नाहीत, अशा भागात रस्ते केले आहेत. जेथे लोक राहतात, अशा वस्त्यांमध्ये रस्तेच नाहीत, या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे. 


पावसाळ्यात रस्त्याची कामे होणार नाहीत 
विविध योजनांमधील रस्ते विकास कामांच्या वर्क आॅर्डर दिलेल्या आहेत. कामाचे भूमिपूजन सुरू असले तरी पावसाळ्यात कामे करता येणार नाहीत. पावसाळ्यानंतरच रस्त्यांची कामे होतील.
- संदीप कारंजे, प्र.नगरअभियंत, मनपा 


पावसाळ्यात शहरात खड्डेच 
पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवरील खड्डे प्रिमिक्स टाकून बुजवता येत नाहीत. मान्सूनपूर्व कामात खड्डे बुजवणे आवश्यक असताना पूर्व भागासह अनेक रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाळ्यात शहरात खड्ड्याचा त्रास होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...