आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार नीट करा, नाही तर मनपा बरखास्त करतो, सीएमनी सुनावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरचा कारभार नीट करा, नाही तर सोलापूर महापालिका बरखास्त करू, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्यरात्री सोलापूर महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांसह सहकारमंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सुनावले. या बैठकीसाठी केवळ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. पण मुख्यमंत्र्यांनी एेनवेळी सगळ्याच नगरसेवकांना पाचारण केल्याने दुपारी सगळे नगरसेवक मुंबईला रवाना झाले. खासदार शरद बनसोडे मात्र सोलापुरातच थांबून होते. 


सोलापूर महापालिकेच्या कारभारावरून सध्या नागरिकांमध्ये नाराजी अाहे. दोन्ही देशमुख गटांमुळे सर्वसाधारण सभेतही विषय मंजूर होईनात. त्यातच सध्या सभागृहनेते सुरेश पाटील गेल्या काही दिवसांपासून अाजारपणामुळे येऊ शकत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच दखल घ्यावी लागली. बुधवारी त्यांनी मुंबईत बैठक बोलावली. त्याला महापौरांसह पदाधिकारी अाणि दोन्ही देशमुख मुंबईत दाखल झाले होते. पण दुपारी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नगरसेवकांना बोलवा असे फर्मान सोडले अाणि घाईघाईत ३५ नगरसेवकांना मुंबईला नेण्याची सोय करण्यात अाली. ते रात्री उशिरा मुंबईत पोहोचल्यानंतर बैठक सुरू झाली. 


बैठक सुरू होताच बैठकीला फक्त नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी बसावे, अन्य जणांनी बाहेर जावे असे सांगितल्यामुळे नगरसेविकांचे पती, काही कार्यकर्ते यांना बैठक संपेपर्यंत मध्यरात्री उशिरापर्यंत बाहेर ताटकळत थांबावे लागले. त्यात राजू पाटील, प्रमोद हुच्चे, आनंद बिरू, दत्तू पोसा, श्रीशेल बनशेट्टी, राजू काकडे, सुनील मुदगल आदींचा समावेश होता. बुधवारी रात्री १०.३० वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री एकपर्यंत वर्षा या शासकीय बंगल्यावर चालली. एेनवेळी नगरसेवकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सरचिटणीस व्ही. सतीश, सोलापूरचे प्रभारी उमा खापरे, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांच्यासह सहकारमंत्री पालकमंत्री गटाचे सुमारे ३५ नगरसेवक उपस्थित होते. 


सभागृह नेत्याबाबत निर्णय नाही
महापालिका सभागृह नेत्यांच्या बाबतीत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या सभेत विषयांचे वाचन कोण करेल याबाबत निर्णय नाही. या बैठकीला दोन्ही मंत्री एकत्र आले नव्हते, मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही अबोलपणे दोघे दोन वाटेने निघून गेले. त्यामुळे पुन्हा वाद मिटणार का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ... 
लोकांनीतुम्हाला आशेवर निवडून दिलेले आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज एकदिलाने करा, सर्वांनी तिळगूळ कार्यक्रमात एकत्र या. यापुढील काळात दोन्ही मंत्र्यांची छबी कामातून दिसली पाहिजे. मतभेद निर्माण करून वाद वाढवत असाल तर महापालिका बरखास्त करून टाकीन. 


दोन्ही मंत्र्यांनी एकोपा ठेवावा 
सहकारमंत्रीसुभाष देशमुख राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात एकोपा ठेवून काम करावे. एकत्र काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितले. एकूणच परिस्थितीचा अाढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दांत सुनावले. 


मंत्र्यांबद्दल तक्रारी अन् महापौरांची बाजू 
बैठकीनंतरमिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही मंत्र्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. परस्पर गटाच्या नगरसेवकांनी या तक्रारी केल्या. महापौर शोभा बनशेट्टी यांच्याबद्दलही काही जणांनी तक्रार केली. त्यावर महापौरांनी नऊ महिन्यांत नऊ रुपयांचाही भ्रष्टाचार केला नाही तरीही पक्षातूनच तक्रारी होतात, अशी बाजू मांडली. 

बातम्या आणखी आहेत...