आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांमुळेच गर्भपात करणारे डाॅक्टर दांपत्य पळाले; जिल्हा विधी समुपदेशकांची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- वेळापूर (ता. माळशिरस) येथे गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे डॉक्टर दांपत्य पोलिसांमुळेच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कारवाईसाठी येथील डॉटर मॉम फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी व सर्जिकल नर्सिंग होम आणि दोशी अल्ट्रासाउंड या दवाखान्यात डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी हे डॉक्टर दांपत्य बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती आरोग्य खात्यास मिळाली होती. तपासणीत येथे बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचे आढळल्यानंतर डॉ. दोशी दांपत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोशी दांपत्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दिवस मावळल्यानंतर महिला आरोपीस ताब्यात अथवा अटकेत घेता येत नसल्याचा निर्वाळा देत पोलिसांनी डॉ. जयश्री दोशी यांना ताब्यात न घेता त्यांच्या घरी ठेवले. तेथे महिला पोलिस हवालदार पवार यांना नेमले. डॉ. आनंद दोशी यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यातून डॉ. आनंद दोशी व घरी पोलिसांचा पहारा असतानाही डॉ. जयश्री दोशी पळाल्या. पोलिसांनी त्यांना पळून जाण्यास मदत केल्याची तक्रार डॉ. रामेश्वरी माने यांनी थेट पोलिस अधीक्षक प्रभू यांच्याकडे केली आहे. 


फौजदार जगताप वादाच्या भोवऱ्यात 
फौजदार सदाशिव जगताप व इतर पोलिसांवर आरोप होत आहे. सदाशिवनगर येथील डॉ. एस. एस. कदम व डॉ. भगत यांच्या अशाच प्रकरणात जगताप यांनी गैरप्रकार केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉ. दाते यांनी केली होती. तेच जगताप येथेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. येथील प्रभारी अधिकारी एपीआय परशुराम कोरके, हवालदार पवारसह इतर पोलिसांचीही चौकशी सुरू आहे. 


आज अहवाल देणार 
या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस अधीक्षकांनी पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना नेमले आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षकांना देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 


प्रांताधिकाऱ्यांना निवेदन 
दोषी डॉक्टर व पोलिसांवर कारवाई व्हावी. पोलिसांना निलंबित करावे, असे डॉटर मॉम फाउंडेशन प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्ष शीतलदेवी मोहिते यांनी सांगितले. 


 दोन्ही संशयितांना पोलिसांनीच पळवून लावल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे. आर्थिक देवाणघेवाण झाली असावी. दोषी पोलिसांना निलंबित केले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. 
- अॅड. रामेश्वरी माने, जिल्हा विधी समुपदेशक 


संशयितांवर गुन्हा दाखल नसल्याने त्यांना अटक करता येत नव्हती. आमचे हवालदार विक्रम सूर्यवंशी यांना गुंगारा देऊन डाॅ. आनंद दोशी पळाले. या डाॅक्टर दांपत्यांचा शोध सुरू आहे. 
- परशुराम कोरके, प्रभारी सहायक पो. नि., वेळापूर 

बातम्या आणखी आहेत...