आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन महाराज पालखीचे आगमन, दोन दिवसांसाठी शहरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शेगावहून आलेल्या गजानन महाराज पालखीचे रविवारी सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे जोरदार स्वागत झाले. सोमवारी सकाळी शहरात आगमन होईल. सायंकाळी कुचन प्रशालेत तर मंगळवारी सकाळी सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयात मुक्काम असणार आहे. 


स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रारजेंद्र भारुड, आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदी होते. गेल्या ५१ वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीने ३३ दिवसांपूर्वी शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पांढऱ्या रंगाच्या वेशात खांद्यावर पताका घेऊन टाळ-मृदंगाच्या ही पालखी आली. रविवारी पहाटे तुळजापूरच्या बालाघाटातून ही दिंडी सोलापूरकडे मार्गस्थ झाली. पावसाच्या सरींना अंगावर घेत वारकऱ्यांनी टाळ-मृदंगचा गजर सुरूच ठेवला. फुलांनी सजवलेल्या पालखीतून भक्तगणांनी गजाननांचे मुखदर्शन घेतले. 


आज शहरात स्वागत 
दिंडीने रात्री उळ्यात मंदिरात विसावा घेत सोमवारी पहाटे चारला आरती करुन शहराच्या दिशेने निघेल. सकाळी ९ वाजता रुपाभवानी रोडवर पाणी गिरणीजवळ महापौरांच्या हस्ते स्वागत होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कुचन प्रशाला येथे मुक्काम आणि मंगळवारी सातरस्ता येथील उपलप मंगलकार्यालयात विसावा घेणार. बुधवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. 


बंदोबस्तासाठी सव्वाशे पोलिसांचा ताफा सज्ज 
सुमारे १२५ पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी आहे. सोमवारी जोडभावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पालखी आहे. त्यासाठी सात फौजदार, सहायक निरीक्षक, ७५ कर्मचारी, २० महिला कर्मचारी असा बंदोबस्त नेमल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली. मंगळवारी सकाळी उपलप मंगल कार्यालयात पालखी विसावेल. त्यासाठी जेलरोड व सदर बझार पोलिस बंदोबस्त देतील. बुधवारी फौजदार चावडी व सलगर वस्ती पोलिस बंदोबस्तासाठी आहेत. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांचे वेगळे पथक आहे. पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर पाठीमागील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील. दुभाजक रस्ता आहे त्या मार्गावर एका बाजूने पालखी सोहळा व दुसऱ्या बाजूने वाहने ये-जा करतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष शिंदे यांनी दिली. एकूणच तीन दिवस पालखी सोहळ्यासाठी व वाहतूक नियोजनासाठी पोलिसांनी आराखडा तयार केला आहे. बंदोबस्ताचे नियोजन पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांच्याकडे आहे. 


उळ्यात मोठे स्वागत 
पालखी उळे गावात येताच, ढोलीबाजाने त्याचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी वेशीपासूनच रांगोळी घातली होती. सरपंच नीता धनके, आप्पा धनके, उपसरपंच बाळू शिंदे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. 


५१ वर्षे, ७०० वारकरी 
या पालखीला यंदा ५१ वर्ष पूर्ण होतात. पालखी सोबत ७०० वारकरी, अश्व आणि वाहने असा लवाजमा आहे. ३३ दिवसांचा प्रवास करत या दिंडीने रविवारी सायंकाळी सोलापूर हद्दीत प्रवेश केला. 

बातम्या आणखी आहेत...