आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमेत पाणी सोडणे बंद झाले तर भीमा पट्ट्यात उसाचे क्षेत्र बकाल; आजी-माजी खासदार मोहितेंचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- सोलापूरला जलवाहिनीने पाणी नेण्यास हरकत नाही. परंतु भीमा नदीत पाणी सोडणे बंद होता कामा नये. असे झाल्यास २७० किलोमीटरच्या नदीपट्ट्यातील सुमारे १ लाख ६० हजार एकर क्षेत्र बकाल होईल. जिल्ह्याचे उद्याचे भविष्य सावरण्यासाठी सर्वांनी जागे व्हा, असे अवाहन करत नदीतून पाणी सोडणे बंद होता कामा नये, असा सूर खासदार विजयसिंह मोहिते व माजी खासदार रणजितसिंह मोहिते या पिता-पुत्रांनी आळवला. 


नेवरे (ता. माळशिरस) येथे विविध विकासकामांच्या उद््घाटनाच्या निमित्ताने झालेल्या सभेत शुक्रवारी मोहिते पिता-पुत्रांनी यासंदर्भात भाष्य केले. सोलापूर शहरास पिण्याच्या पाण्यासाठी ४३९ कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी वर्षातून चारवेळा नदीत पाणी सोडले जाते. या पाण्यामुळे सोलापूरचा पाणी प्रश्न मिटतो त्याशिवाय नदीकाठच्या गावात शेती व पिण्याच्या पाण्याची सोय होते. यासाठी नदीतून पाणी सोडणे बंद होता कामा नये अशी भूमिका खासदार विजयसिंह मोहिते यांनी व्यक्त केली. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. उजनीजवळ उगमापासून ते कर्नाटक सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २७० कि.मी.एवढी आहे. या पट्ट्यात सुमारे १ लाख ६० हजार एकर क्षेत्र भीमेवर अवलंबून आहे. नदीतून पाणीच नाही आले तर हा परिसर बकाल होणार आहे. याचा विचार करायला हवा असे माजी खासदार रणजितसिंह मोहिते म्हणाले. 


खासदार विजयसिंह मोहिते यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा चांदीची मूर्ती देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सहकारमहर्षी कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, सरपंच सविता पाटील, उपसरपंच अजिनाथ पाटील व ग्रामस्थांनी हा सत्कार केला. या कार्यक्रमास नंदिनीदेवी मोहिते, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते, सुलक्षणादेवी मोहिते, मदनसिंह मोहिते, धैर्यशील मोहिते, शीतलदेवी मोहिते, स्वरूपाराणी मोहिते, वैष्णवीदेवी मोहिते, अॅड. प्रकाश पाटील, रामचंद्र सावंत, प्रताप पाटील, राजेंद्र यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आभार मानले. या वेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


नदीतील पाण्यावर साखर कारखानदारी 
जिल्ह्यातील ३२ पैकी २२ साखर कारखाने हे नदी पट्ट्यातील उसावर अवलंबून आहेत. पाणी बंद झाले तर कारखानदारी मोडकळीस येईल. भीमेवर अवलंबून पाणीपुरवठा योजना बंद पडतील अशी भीती रणजितसिंह यांनी व्यक्त केली. भीमेत ५ टीएमसीने चारवेळा पाणी सोडले जाते, हे पाणी वाचवून काय करणार आहात, याबद्दल मला शंका आहे, असेही ते म्हणाले. कृष्णा-भीमा स्थिरीकरणावरही त्यांनी जोर दिला. खासदार मोहिते यांच्या प्रयत्नातून नेवरे येथे भीमेवर पूल बांधला गेला आता उंबरे येथेही पूल होणार आहे. 


विजयसिंहच पुढचे उमेदवार 
आगामी लोकसभेसाठी खासदार विजयसिंह मोहिते हेच उमेदवार असतील. माझं नंतर बघू असे रणजितसिंह मोहिते यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. विजयसिंह यांच्या केवळ वयाच्या आकड्यात वाढ झाली आहे. तरुणाई व सर्व वयोगटाचा त्यांनाच पाठिंबा आहे. त्यामुळे माढा लोकसभेचे उमेदवार तेच असतील असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...