आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठ नामांतर; अंतिम निर्णयासाठी समिती, चार मंत्र्यांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर अाता या प्रकरणी अधिक विचार विनिमय करण्यासाठी उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला अाहे. चार जणांची ही समिती अाता नामांतराबाबतचा अंतिम निर्णय घेणार अाहे. नामांतर, नामविस्ताराच्या अनुषंगाने संबंधितांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य व योगदान या बाबी समिती विचारात घेईल, असे शासन निर्णय पत्रात म्हटले अाहे. 


उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ३ मार्च रोजी या संदर्भातील एक शासन निर्णय जारी केला. त्यात म्हटले अाहे की, सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या प्रकरण एक मधील अनुक्रमांक १० येथे सोलापूर विद्यापीठाएेवजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अशी सुधारणा करण्याबाबत २१ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या विषयावर अधिक विचार विनिमय करण्याकरिता मंत्रीस्तरीय उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात अाला होता. 


या निर्णयाला अनुसरून ३ मार्च रोजी शासन निर्णय जारी करून समितीची घोषणा करण्यात अाली अाहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे समितीचे अध्यक्ष अाहेत. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे अाणि पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश अाहे. समितीने अहवाल कधी द्यावा याबाबतची कालमर्यादा या पत्रात नाही.

 
अन्य नावांचाही विचार 
समिती सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार अथवा नामांतरणाच्या अनुषंगाने विविध संघटना, विद्यार्थी संघ, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून प्राप्त झालेली निवेदने व पत्रे याद्वारे सुचविलेली नावे विचारात घेईल. त्या करिता अावश्यक असलेली माहिती समिती घेईल. दरम्यान विद्यापीठ नामांतरासाठीचे ३० प्रस्ताव विविध मागण्यांद्वारे अालेले अाहेत. ही नावेही अाता समिती विचारात घेणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...