Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about water supply in solapur

गढूळ पाणी ढवळले, आयुक्त म्हणाले, पोट मक्तेदारासह कामाची चौकशी

प्रतिनिधी | Update - Aug 01, 2018, 12:12 PM IST

उजनी जलवाहिनी दुरुस्तीकरिता घेण्यात आलेल्या ४८ तासांच्या शटडाऊनबाबत कोणाला कल्पना दिली, दुरुस्तीचे काम पोट मक्तेदार कसे

 • news about water supply in solapur

  सोलापूर- उजनी जलवाहिनी दुरुस्तीकरिता घेण्यात आलेल्या ४८ तासांच्या शटडाऊनबाबत कोणाला कल्पना दिली, दुरुस्तीचे काम पोट मक्तेदार कसे करत होता, काम चुकीचे झाल्यास त्याला कोण जबाबदार, दुरुस्तीच्या कामावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हता, दोन दिवसापासून आलेले गढूळ पाणी पिण्यायोग्य कसे, आदी नगरसेवकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर न द्यायला लावता महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्तांना उत्तर द्यायला लावले. यावर आयुक्तांनी "मी नव्हतो, चौकशी करून दोषीवर कारवाई करू,' असे म्हणताच या प्रकरणावर पडदा पडला.


  सभेच्या सुरुवातीला सत्ताधारी भाजप वगळता विरोधी सर्वपक्षीय नगरसेवकंानी गढूळ पाणी पुरवठा केल्याबद्दल प्रशासनाचा आणि बेफिकीर सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. सभा सुरू झाल्यानंतर नगरसेवक किसन जाधव यांनी गढूळ पाणी बाटलीमध्ये आणले आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे असे अधिकारी म्हणतात. तर येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी हे पाणी प्यावे, असे म्हणणे मांडले.


  सभागृह नेत्याचीही तक्रार
  दुरुस्तीच्या कामावेळी एकही महापालिका अधिकारी तेथे नव्हता, मुख्य मक्तेदार आयएचपी हा काम करत नसून सोनी नावाचा पोट मक्तेदार काम करत आहे, हे मनमानी काम कसे होत आहे, असा प्रश्न सभागृहनेते संजय कोळी आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उपस्थित केला. तरीही या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी दिलीच नाही. दोन तासाच्या चर्चेनंतर आयुक्त म्हणाले, गढूळ पाणी येत आहे हे मान्य आहे, त्यातील तांत्रिक कारणे पाहतो, दररोजचे टेस्टींग रिपोर्ट पाहतो, अधिकारी मला दर दोन तासाला फोनवरून अपडेट देत होते, पोट मक्तेदार कोण काम करतोय हे पाहतो, दोषींवर कारवाई करतो, अशी उत्तरे दिली आणि सर्व सभागृह शांत झाले.


  >मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३० विषय घेऊन ते सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच एक विषय दफ्तरी दाखल करण्यात आला.
  > गढूळ पाणी प्रश्नावर अधिकारी उत्तर देत नाहीत, त्यांना नागरिकांची काळजी नाही, ते पाणी मीच पितो, असे म्हणत नगरसेवक पुजारी यांनी गढूळ पाण्याची बाटली तोंडाला लावली. तेव्हा काही नगरसेवकांनी त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली.


  महापौर चिडल्या, धुत्तरगावकरही आक्रमक
  विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना बोलायला का देत नाहीत, सभेत वेगळा पायंडा पाडू नका, अशी मागणी गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केली. यावर महापौर चिडल्या, तुम्ही आम्हाला शिकवू नका, असे म्हणताच धुत्तरगावकर यांचा राग अनावर झाला, अन् ते म्हणाले, लोकशाहीमध्ये आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन बाहेर जाईन. इतक्यात बाकीच्या नगरसेवकांनी प्रकरण शांत केले.


  "ध' चा "मा' : शिक्षणाधिकाऱ्यांची माफी
  महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आला. त्यामध्ये "बेटी बचाओ, बेटी पढाओ' या ऐवजी "बेटी बचाओ, बेटी पठाओ' असे चुकीच्या शब्दांचा उल्लेख झाला होता. हा मुलींचा आणि महिलांचा अपमान आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेविका फिरदाेस पटेल यांनी केली. यावर सर्व सभागृहाने आवाज उठविला. प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे यांनी याप्रकरणी माफी मागितली.

Trending