आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाने एआयसीटीई या सर्वोच्च संस्थेला विशेष अहवाल पाठवून राज्यात किमान यावर्षी आणखी नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी न देण्याची शिफारस केली आहे. बाटूचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी ही माहिती दिली. अर्थात ही शिफारस आहे. नवे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा या संस्थेला जन्मजात अधिकारच आहे. पण बाटूने अभियांत्रिकी शिक्षणाची सद्य:स्थिती, पुढील आव्हाने याचा अभ्यास करून हा अहवाल पाठवल्याचे ते म्हणाले.
आॅर्किड अभियांत्रिकीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. गायकर सोलापुरात आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी स्वतंत्र संवाद साधला. या वेळी आॅर्किडचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार, ट्रस्टी अमर जाधव, एन. एम. पाटील, प्रा. बसवराज बिराजदार, महेश अंदेली, इक्बाल बागवान उपस्थित होते.
डॉ. गायकर म्हणाले, देशात ४० लाख अभियांत्रिकीच्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध असतात. महाराष्ट्रात १ लाख ५० हजार अभियांत्रिकी जागांची क्षमता आहे. राज्यापुरता विचार केला तर यातील एक लाख जागा यंदा भरल्या. उर्वरित रिक्त राहिल्या आहेत. मुळात अभियांत्रिकी पूर्ण करणाऱ्यांपैकी १० टक्के अभियंत्यांना जॉब मिळतो. महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पूर्णच होत नसताना आणखी नव्या अभियांत्रिकीची मान्यता महाराष्ट्रात यंदा देऊ नये, असे बाटूने एआयसीटीईला अहवालाद्वारे कळवले आहे. ]
उद्योजक अभियंता पॉलिसीची गरज
अभियांत्रिकी शिक्षणाला स्टार्टअप पॉलिसीची जोड देता यावी, इनोव्हेशन आंत्र्यप्रेनरशीप केंद्र सुरू करण्यासाठी रूसाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवला आहे. तो मान्य होईल. यातून अभियांत्रिकीला उद्योजकतेची जोड देता येईल. दहा टक्के उद्योजक अभियंता निर्माण होऊ शकले तरी उर्वरित ९० टक्के अभियंत्यांना जॉब मिळू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.