आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ, उन्नावच्या नराधमांना फाशी द्या, विविध संघटनांकडून आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुष्कर्माच्या घटनांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॅण्डल मार्च काढण्यात आला. - Divya Marathi
दुष्कर्माच्या घटनांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॅण्डल मार्च काढण्यात आला.

सोलापूर- कठुआ व उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे, असा आक्रोश व्यक्त करत यातील आरोपींना सरकारने पाठीशी घालण्याच्या प्रयत्नांचा विविध संघटनांनी सोमवारी निषेध केला. पाशवी कृत्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत विविध सामाजिक संस्था, संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 
जम्मूच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आठ जणांनी सामूहिक दुष्कृत्य केले. आठ दिवस गावातील मंदिरात तिला डांबून ठेवत नशेच्या गोळ्या देत अत्याचार करण्यात आला. तर उन्नाव (उत्तर प्रदेश) येथे भाजपच्या एका आमदाराने अल्पवयीन मुलीवर दुष्कृत्य केले. तक्रार मागे घेण्यासाठी दबाब आणत पीडित मुलीच्या पित्यास मारहाण केली. पोलिसांच्या कोठडीत पित्याचा मृत्यू झाला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 


डी. एम. सामाजिक संघटनेच्या वतीने दिलावर मणियार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक माेर्चाच्या जाकीर हुसेन डोका यांनी दिलेल्या निवेदनामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अमानुष अत्याचार करून खून करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. 


राष्ट्रवादी महिलांतर्फे कँडल मार्च 
राष्ट्रवादी शहर महिला आघाडीतर्फे रविवारी सायंकाळी डॉ. आंबेडकर पुतळा ते चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळा येथे समारोप झाल्यानंतर अत्याचारित चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व पुरावे गोळा करून सक्षम बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या निरीक्षक निर्मला बावीकर यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राजू कुरेशी, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुनीता रोटे, मनीषा नलावडे, संगीता कांबळे, अहमद मासूलदार, सिया मुलानी, नसीमा शेतसंदी, जयश्री पवार, आशालता दीक्षित, सायरा शेख, करूना काशीद, सुरेखा माशाळ, विमल मस्के, महानंदा सुतार,लक्ष्मी कारंडे, अंकिता रोटे आदी उपस्थित होते. 


यशदा फाउंडेशनचे मूक आंदोलन 
यशदा युवती व महिला फाउंंडेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थापिका फिरदोस पटेल, मनीषा उडाणशिवे, मुमताज गौर, उषा कसबे, हमीदा पठाण, अफसाना शेख, नाजिरा पठाण, मंजू चव्हाण, जिनत शेख, मुस्कान पठाण, रुक्साना शेख आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या. 


जनवादी महिला संघटना 
लहान निष्पाप बालिका व युवतीवरील अमानवी अत्याचार तसेच बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व विचारवंतांवरील हल्ले याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेसह विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन निदर्शने करून निषेध व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगरसेविका नसिमा शेख, युवा आघाडीचे अनिल वासम, विद्यार्थी आघाडीचे मीरा कांबळे, मल्लेशम कारमपुरी, महिला आघाडीचे नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, पुष्पा पाटील, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, आरोग्य विभागाचे रणखांबे आदींनी घटनेचा निषेध केला. 


सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचा कँडल मार्च 
शहर काॅँग्रेसतर्फे सायंकाळी चार हुतात्मा पुतळा ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, विश्वनाथ चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, अल्पसंख्याक अध्यक्ष हाजी तौफिक हत्तुरे, नलिनी चंदेले, सुशीला आबुटे, श्रीदेवी फुलारे, फिरदोस पटेल, परवीन शेख, रियाज हुंडेकरी, चेतन नरोटे, विनोद भोसले, शौकत पठाण, मकबुल माेहोळकर, संजय हेमगड्डी, दत्ता सुरवसे, धर्मा भोसले, मैनोद्दीन शेख, केदार उंबरजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अमानवीय दुष्कर्म करणाऱ्या नराधमांना सरकारने पाठीशी घालू नये. या शैतानांना लवकरात लवकर फाशी व्हावी. महिलांनी जर ताकद दाखवली तर एक चळवळ सुरू होईल, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...