आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीचा सांगोल्यात 'शेकाप'चा मोर्चाद्वारे निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला- पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करावेत. दुधाला शासकीय हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून सातबारा कोरा करावा. धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि रखडलेल्या टेंभू, म्हैसाळ योजनेसह सांगोला शाखा कालव्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा मागण्यांसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष शाखा सांगोला यांच्या वतीने शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा फुले चौकातून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल पायी चालवत सांगोला तहसील कार्यालयावर पदाधिकाऱ्यांचा मोर्चा नेला. केंद्र व राज्यसरकारने येत्या आठ दिवसात इंधन दरवाढ रोखली नाही. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत देशमुख यांनी दिला आहे. 


मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोर सभेत झाले. या वेळी चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, अॅड. सचिन देशमुख, सभापती मायाक्का यमगर, विमल कुमठेकर, कल्पनाताई शिंगाडे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रभारी नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे यांना निवेदन देण्यात आले. 


या वेळी कल्पनाताई शिंगाडे यांनी ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे सांगून सरकारने दरवाढ रोखली पाहिजे असे सांगितले. या वेळी माजी उपसभापती संतोष देवकते, जि. प. सदस्य अॅड. सचिन देशमुख, किशोर बनसोडे, प्रा. बंडगर, आदींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात पं. स. सदस्य नारायण जगताप, दिगंबर शिंगाडे, तानाजी चंदनशिवे, अॅड. धनंजय मेटकरी, सुरेश माळी, रफीक तांबोळी, गजानन बनकर, अंकुश येडगे, दीपक गोडसे, बाळासाहेब बनसोडे, मायाप्पा यमगर, सुभाष गावडे, राजू मगर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त होता. 


इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले : चंद्रकांत देशमुख 
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, अन्नधान्याचे दर वाढले आहेत. याची झळ गोरगरीब, कष्टकऱ्यांना बसत असल्यामुळे आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो म्हणून हा सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार उद्योगपतीचे आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काहीच सोयरसुतक नसल्याने झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख यांनी मोर्चाप्रसंगी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...