आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सभापती'साठी फेर निवडणूक, शिवसेना न्यायालयात जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना गोंधळ झाल्याचे कारण पुढे करत, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी या निवड प्रक्रियेस स्थगिती दिल्याने सभापती निवड प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पीठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले. मंगळवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार असून बुधवारी मतदान होणार आहे. तसेच याबाबत विशेष बैठक बोलावण्यात आल्याची माहिती डॉ. भारुड यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांनी सांगितले. पीठासन अधिकारी डाॅ. भारुड यांनी अर्ज आल्यावर गांेधळ झाला. त्यामुळे नव्याने प्रक्रिया हाेईल, असे सांगितले. भाजप उमेदवाराच्या अर्जाची पळवापळवी झाल्याने गोंधळ झाला. त्यामुळे विभागीय अायुक्त दळवी यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्याचे आदेश दिले. त्यास शिवसेनेचे वानकर यांनी आक्षेप घेतला. निवडणूक प्रक्रिया थांबवता येत नाही. अर्ज पळवल्याची प्रशासनाकडून पोलिसांत फिर्याद नाही. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करा, अशी भूमिका मांडली. ती फेटाळत पुन्हा प्रक्रिया राबवू, असे डाॅ. भारुड यांनी सांगितले. 


उमेदवार कोण पुन्हा संघर्ष 
भाजपने पालकमंत्री गटाचे कणके यांची उमेदवार जाहीर केली. त्यास सहकारमंत्री गटाने विरोध करत शेजवाल यांचा अर्ज दिला होता. नव्याने प्रक्रियेत सहकारमंत्री गटाने आपल्यास उमेदवारी मिळावी, नवीन नावाची घोषणा करावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. सहकारमंत्री गटाच्या एक महिला सदस्यांनी मला संधी द्या, असे मत मांडले. 

 

विरोधक एकत्र राहिले तर चिठ्ठी 
नव्याने प्रक्रियेत विरोधी पक्षाचे आठ सदस्य एकत्र राहणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन प्रक्रियेत भाजपचे आठ तर विरोधकांकडे आठ सदस्य असतील. विरोधक एकत्र राहिले तर चिठ्ठी काढून सभापती पद निवडले जाईल. प्रक्रिया पुढे ढकलल्याने सेनेचे महेश कोठे, बसपचे आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे चेतन नरोटे, एमआयएमचे ताैफीक शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, यांनी निषेध व्यक्त केला. 


योग्य न्याय मिळाला 
शिवसेनेने गोंधळ घातल्याने आम्हाला अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करता आली नाही. आम्ही रीतसर तक्रार दिली होती. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत नव्याने प्रक्रिया सुरू केली. आम्हाला न्याय मिळाला. नव्याने अर्ज दाखल करून त्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल.
- शोभा बनशेट्टी, महापौर 


निर्णयाविराेधात न्यायालयात जाणार 
स्थायी समिती निवड प्रक्रियेत भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे गोंधळ घातला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी केली. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना त्यांनी ठोस कारण न देता पुन्हा प्रक्रिया घेऊ असे सांगितले. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहे.
- गणेश वानकर, शिवसेनेचे स्थायी समिती सभापती उमेदवार 


गाडी सजली पण.. 
शनिवारी स्थायी समिती सभापती निवड होणार असल्याने महापालिकेने स्थायी समिती सभापतीची गाडी आणि कार्यालय सजवले होते. प्रक्रिया पुढे ढकलल्याने सजलेली गाडी तशीच राहिली. गुरुवारी झालेला गोंधळ पाहता, पोलिसांनी खबरदारी म्हणून शनिवारी बंदोबस्त वाढवला. एक पोलिस उपायुक्त, एक सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षकांसह ७५ पोलिसांचा बंदोबस्त होता. स्थायी समिती कार्यालयात निवडकांना सोडले. 


पोरकटपणा, पण भाजपलाच फायदा 
भाजपतील गटबाजीमुळे अर्ज दाखल करताना गोंधळ झाला. शेजवाल अर्ज दाखल करण्यासाठी सूचक व अनुमोदकासह आले असताना त्यांचा अर्ज पळवला. या प्रकारानंतर भाजपचे नगरसेवक नंतर एकत्र आले. त्यानंतर तक्रार दिल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली. हा निर्णय भाजपसाठी सुखदायक असून, शिवसेनेसाठी धक्कादायक आहे. दाखल झालेल्या अर्जापैकी कणके यांच्या अर्जावर अनुमोदक नसल्याने त्यांचा अर्ज बाद होऊन सेनेचे वानकर बिनविरोध झाले असते. 

बातम्या आणखी आहेत...