आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या गण रचनेत सत्ताधाऱ्यांची सोय, मात्र मतदारांची गैरसोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर- सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४४ गावांची १५ गणांमध्ये रचना केली आहे. १५ पैकी पाच गणांचे २० जानेवारी रोजी आरक्षण काढण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार केलेली गणनिहाय रचना पाहता मतदारांऐवजी सत्ताधाऱ्यांची अधिक सोय केल्याची चर्चा आहे. १० पंचायत समिती गण असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात बाजार समितीसाठी ८ तर चार पंचायत समिती गण असलेल्या उत्तर तालुक्यात ५ तर शहरात २ गणाची निर्मिती केली आहे. एकाच गणामध्ये भाजपचा प्रभाव असलेली अधिक गावे कशी येतील? याची सोय गणाची रचना करताना पाहिल्याचे दिसून येते. 


काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या गावांसह व पंचायत समितीचे गण फोडून बाजार समितीच्या सत्तेसाठी सोयीचे गण सहकारमंत्र्यांच्या दबावाखाली निश्चित केलेत की काय? अशी गणामधील गावांची यादी पाहून चर्चा झडू लागली आहे. मतदारांच्या संख्येचे कारण पुढे करीत प्रशासन गणाची रचना अचूक झाल्याचे सांगत असले तरी या गणरचनेमुळे मात्र मतदारांची गैरसोय झाली आहे, तर काही राजकीय मंडळींची सोय करण्यात आल्याचे चित्र आहे. 


गणाची रचना करताना राजकीय लाभ कसा उठवता येईल? याचा प्राधान्याने विचार केला आहे. हत्तूर व कुंभारी गावात काँग्रेस मजबूत आहे. मात्र ही गावे शहराला जोडलीत. तर मंद्रूप गणाला उत्तर सोलापूरची नंदूर व समशापूर ही गावे जोडली आहेत. 


मतदारांच्या सोयीसाठी माळकवठे गाव मंद्रूपला जवळ असताना औरादला जोडण्यामागील हेतू काय? शहराला जोडलेल्या हत्तूर ग्रुप ग्रामपंचायतीचा चंद्रहाळ भाग होटगीऐवजी मंद्रूप गणामध्ये समाविष्ट केला आहे. आचेगाव होटगीला जोडण्याऐवजी कणबस हा स्वतंत्र गण करून त्यास जोडले आहे. पंचायत समिती गण व मंडल नसताना कणबसच्या नावाने होटगी जिल्हा परिषद मतदार संघातील गावे फोडली आहेत. असाच प्रकार कुंभारी व बोरामणी भागात झाला आहे. कुंभारी गणास सोयीची असलेली रामपूर, वडगाव, दिंडूर, तीर्थ ही गावे मुस्ती गणामध्ये जोडली आहेत. याउलट कुंभारी गणामध्ये शहरातील कसबे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे व हत्तूर ही गावे जोडली आहेत. मुस्ती गणास सोयीची असलेली तांदुळवाडी, िपंजारवाडी ही गावे मात्र बोरामणी गणास जोडली आहेत. 


उत्तर सोलापूर तालुक्यातही काही गण वगळता इतर गणरचनेत राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. नान्नज, बीबी दारफळ व रानमसले ही तीन मोठी गावे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकाच गणात समाविष्ट केली आहेत. इतर गणांमध्येही भाजपची वर्चस्व असलेलेे अधिक गावे एकाच गणात कशी आणता येतील? हा प्रयत्न गणरचनेतून करण्यात आला आहे. तालुक्यातील नंदूर, समशापूर ही गावे मंद्रूप तर शहरातील कसबे सोलापूर, मजरेवाडी हा भाग कुंभारी गणास जोडला आहे. दक्षिण तालुक्यात पंचायत समितीचे दहा गण असताना बाजार समितीसाठी मात्र दोन कमी करीत आठ गण केले आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समितीचे चार गण असताना बाजार समितीसाठी पाच गणांची निर्मिती केली आहेत. शहरात दोन गणांची रचना करण्यात आली आहे.

 
प्रशासनाने केलेली गण रचना योग्यच 
प्रथमच गण रचना झाल्याने चुकीच्या पद्धतीने झाली अाहे, असे म्हणता येणार नाही. बाजार समितीचे गण आरक्षण पाहिले नाही. दोन्ही तालुक्यातील गावाची सलगता समाेर ठेवून गणाची रचना करण्यात आली आहे. उत्तर तालुक्यातील काही गावे दक्षिणला जोडली आहेत. गणातील मतदारसंख्या समान येण्यासाठी काही ठिकाणी तडजोड केली आहे. प्रशासनाने केलेल्या गणरचनेत कोणत्या त्रुटी वाटत नाहीत.
- शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष भाजप 


जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार 
उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही गावांची गण रचना चुकीची वाटते. उत्तर तालुक्यात तीन गावांचा एक गण तर दक्षिण तालुक्यात १६ गावांचा एक गण केला आहे. अनेक ठिकाणी राजकीय सोय पाहून रचना केल्याचे दिसते. यासाठी गणांची फेररचना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहे.
- राजशेखर शिवदारे, माजी सभापती बाजार समिती. 


गणांची रचना चुकीचीच... 
बाजार समितीसाठी उत्तर व दक्षिण तालुक्यातील गणांची केलेली रचना चुकीची आहे. दक्षिणमध्ये अनेक गावे तोडल्याने सलगता दिसत नाही. गणातील गावांच्या संख्येतही मोठी तफावत दिसते. यामुळे गणाची फेररचना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे.
- सुरेश हसापुरे, संचालक, जिल्हा बँक.