आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- सोमवारी सायंकाळची वेळ, खुर्ची मिळवण्यासाठी सुरू असलेली महिलांची लगबग, बघता बघता खचाखच भरलेले स्मृती मंदिर. पाय ठेवायलाही जागा नाही, सूत्रसंचालिकेने नटरंगी नार लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर... अशी साद घालताच महिलांनी शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू केला, जो कार्यक्रम संपेपर्यंत सुरू होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या एकापेक्षा एक ठसकेबाज अदाकारीने महिला रसिक घायाळ झाल्या नाहीत तरच नवल.
दिव्य मराठी मधुरिमा क्लबच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात सोमवारी सायंकाळी खास महिलांसाठी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शोभा बनशेट्टी, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका राजश्री िबराजदार, सुनीता रोटे, सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, दीपाली काळे, महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या कविता मेरकर, "दिव्य मराठी'चे युनिट हेड नौशाद शेख आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा मधुरिमाच्या प्रमुख वृषाली घाटणेकर, राजेश्वरी भादुले, कामिनी गांधी, आरती अरगडे, माया पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परंपरेप्रमाणे गणेशवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर सहकारी नृत्यांगणांनी मुजरा सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवातच दणक्यात करून दिली. सर्वांच्या तोंडी असलेली या रावजी, बसा भावजी पिकल्या पानाचा देठकीहो हिरवा या लोकप्रिय लावण्या सादर करून महिलांचा उत्साह वाढवला. घ्याल का हो राया एक शालू बनारसी... या लावणीवर महिलांना नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. पारवाळ घुमतंय कसं गं बाय, गेली कुठं गावना, शांताबाई आणि वाट माझी बघतोय रिक्षावाला, कैरी पाडाची... या लावण्यांवर नृत्यांगनासोबतच महिलांनी सभागृह हलवून सोडले. या लावणींचा वृद्ध महिलांनीही मनमुराद आस्वाद घेतला.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सोडा राया सोडा हा नाद खुळा... या लावणीवर तर धमालच केली. काही महिलांनी समोर येऊन नृत्य सादर केले. झाल्या तिन्ही सांजा, करून िशनगार साझा... या गीतावर सुरेखा पुणेकर यांनी थेट रसिकांमधूनच एंट्री घेतली. सुरेखा पुणेकरांसोबत महिलांनी सेल्फी घेण्यासाठी नृत्य करण्यासाठी एकच गर्दी गेली.
‘दिव्य मराठी’ मधुरिमा क्लबतर्फे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार कार्यक्रम सोमवारी झाला. त्यांच्या बहारदार लावणीवर रसिक महिला फिदा झाल्या होत्या. अनेकांनी टाळ्यांसह शिट्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. छाया: दिव्य मराठी
यांची मिळाली साथसंगत
लावणीसम्राज्ञी सुरेख पुणेकर यांच्या नटरंगी नार कार्यक्रमास ढोलकीवर जगन्नाथ करंडे, निखिल लांडगे, मधुकर लोंढे यांनी तर हार्मोनियमवर दीपक काळे सुनील गोडांबरे यांनी साथ दिली. गायक ऋतुजा गायकवाड हिने गायनाची तर टी. सुशील यांनी खुमासदार निवेदनाची जबाबदारी पार पाडली.
वर्षभर विविध कार्यक्रम
मधुरिमाच्याप्रमुख वृषाली घाटणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मधुरिमा क्लबच्या सदस्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नटरंगी नार या कार्यक्रमाने करण्यात आली आहे. वर्षभरात हळदी- कुंकू, हुरडा पार्टी, सहल, महिलांसाठी विविध शिबिरे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक महिलांनी मधुरिमा क्लबचे सदस्य होण्याचे अावाहन घाटणेकर यांनी केले. सदस्य होण्यासाठी ७०३०९२२७३३ किंवा ७७९८८८१७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.