आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 64 गावांत आज मतदान; मोठ्या गावांच्या सरपंच निवडीकडे लागले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- ग्रामपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ६४ जणांना उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तडीपार केले आहे. 


मंगळवेढा पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दारू, जुगार, मटका, मारामारी, गुंडगिरीसह सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ६४ जणांचा प्रस्ताव पाठवला होता. तडीपारीचा आदेश २४ ते २७ डिसेंबर कालावधीत असून, मतदानाकरिता २६ डिसेंबर रोजी स.१० ते कालावधी वगळण्यात आला आहे. 


मंगळवेढा- तालुक्यात १९ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लव्हे यांनी दिली. बठाण, ब्रम्हपुरी, खडकी, जालिहाळ, शेलेवाडी, निंबोणी, मुंढेवाडी, जंगलगी, उचेठाण, अकोला, खुपसंगी, आंधळगाव, महमदाबाद (हु), शिरसी, जुनोनी, भाळवणी, नंदुर, चिक्कलगी, हिवरगाव गावात मतदान होत आहे. ६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ६१ केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 


जेऊरसह गावे संवेदनशील
करमाळा-
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५५ केंद्रे आणि ३२५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. १८ हजार ८१३ महिला १६ हजार ४५७ असे ३५ हजार २७० मतदार आहेत. मतदानाच्या दुसऱ्यादिवशी (दि. २७) मतमोजणी तहसीलमध्ये होणार आहे. डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतीसाठी २६ रोजी मतदान आहे. 


वळसंगमध्ये तिरंगी लढतीने रंगत 
दक्षिण सोलापूर-
वळसंग ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आघाडी श्रीशैल भुसणगी बुडन कटरे गट असा तिरंगी सामना होत आहे. सदस्यांसाठीच्या १५ जागांसाठी ४० जण तर सरपंचपदासाठी पाच महिला उमेदवार आहेत. ग्रामपंचायतीवर काँग्रेस आघाडीचे श्रीशैल दुधगी, श्रीशैल भुसणगी गटाची सत्ता होती. मात्र या गटात फूट पडली. त्यामुळे बुडन कटरे यांनी सत्ता मिळवली होती. 


माढ्यात ३७ हजार मतदार 
माढा-
माढा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी ३७ हजार ७७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ५५ मतदान केंद्रे तर ३५० कर्मचारी, १२ निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. 

 

ईश्वरवठारमध्ये माने यांची प्रतिष्ठा पणाला 

सुस्ते- पंढरपूरतालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात ईश्वरवठार या एकमेव ग्रामपंचायतीसाठी २६ रोजी मतदान होत आहे. धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांच्या महाआघाडीकडून सरपंचपदासाठी विद्यमान सरपंच सीतादेवी माने यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून पूनम विजय मेटकरी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


तीन प्रभागात सात जागांसाठी १४ उमदेवार 
तीनप्रभागात सात जागांसाठी १४ उमदेवार तर सरपंचपदासाठी दोन उमेदवार आहेत. दोन्ही आघाडीकडून प्रत्येक प्रभागात एकमेकाच्या विरोधात सडेतोड उमेदवार दिल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही आघाडीकडून उभे राहिलेले उमेदवार नातेवाईकच असल्याने मतदान नेमके कोणाला करायचे याविषयी मतदारांमध्ये संभ्रम आहे. 

बातम्या आणखी आहेत...