आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ कारखान्यांकडे २४८ कोटींची थकबाकी, साखर आयुक्तांकडून अद्याप कारवाई नाहीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन केले. - Divya Marathi
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन केले.

सोलापूर- जिल्ह्याचा गाळप हंगाम मार्च २०१८ मध्ये संपला. पण अद्याप जिल्ह्यातील कारखानदारांकडून ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. एफआरपी कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांमध्ये पैसे देणे बंधनकारक असताना अधिकाऱ्यांकडून नोटिसा दिल्याचे दाखवून पाठीशी घातले जात आहे. ३१ पैकी ९ साखर कारखान्यांनी पैसे जमा केले आहेत. २२ कारखानदारांकडे २४८ कोटी रुपये थकीत आहेत. जानेवारी २०१८ पासूनच्या बिलाचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक रक्कम सिद्धेश्वर सहकारी ५७ काेटी २८ लाख, सासवड माळी शुगरकडे २४ कोटी ३३ लाख तर गोकुळ शुगरकडे २२ कोटी ६७ लाख रुपयांचा समावेश आहे. 


जिल्ह्यातील विजय शुगर्स, आर्यन, स्वामी समर्थ व शंकर सहकारी या चार साखर कारखान्यांकडे मागील तीन वर्षांपासून ऊस बिलाचे ८१ कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये स्वामी समर्थ ९ कोटी ७ लाख, शंकर सहकारी ३० कोटी ७६ लाख, आर्यन २१ कोटी ५ लाख व विजय शुगर्स २० कोटी १७ लाख रुपये थकीत आहेत. आता पुन्हा जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडे २४८ कोटी रुपये थकले आहेत. 


शासनाने ऊस बिले अदा करण्यासाठी वेळीच पावले न उचलल्यास पुन्हा एकदा कारखानदारांकडे रकमा थकीत राहण्याची शक्यता आहे. ऊसबिलाची रक्कम वसूल करण्यासाठी शासनाने कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून लिलावही काढण्यात आला. मात्र एकाही कारखान्याकडून रक्कम वसूल झाली नाही. आर्यन वगळता इतर कारखानदारांवर गुन्हे दाखल नाहीत. 


साखर आयुक्तांकडून प्रतिसाद नाही 
ऊसबिलाची रक्कम न दिल्या प्रकरणी जिल्ह्यातील किती कारखान्यांवर कारवाई करण्यात आली ? याप्रकरणी साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घाेरपडे यांनी मी एक महिन्याच्या सुटीवर असल्याचे सांगितले. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांवर झालेल्या कारवाईची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 


कारखानदारांच्या पाठीशी अधिकारी 
कारखानदारांकडून ऊस बिल मिळत नसल्याची तक्रार करूनही साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी कारखानदारांना नोटिसा बजावल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कारखानदारांच्या कार्यालयास व कारखान्यास हेलपाटे मारूनही बिले देण्यास टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे खुद्द अधिकारी, कारखान्याच्या अध्यक्षांनी मोबाइलच बंद ठेवला आहे. 


२२ कारखान्यांकडे २४८ कोटी थकीत रक्कम 
आदिनाथ ६.७४ कोटी, भीमा टाकाळी ४.५९ कोटी, सिद्धेश्वर ५७.२८ कोटी, संत दामाजी ३.६८ कोटी, सहकारमहर्षी १.८९ कोटी, मकाई ८.४२ कोटी, कुर्मदास ६.७१ कोटी, सासवड माळी शुगर २४.३३ कोटी, लोकमंगल अॅग्रो ७.८१ कोटी, लोकमंगल शुगर्स १३.९६ कोटी, सिद्धनाथ शुगर ३.९८ कोटी, इंद्रेश्वर शुगर्स २.५० कोटी, भैरवनाथ शुगर २ -१२.०४ कोटी, फॅबटेक शुगर्स १९.३४ कोटी, युटोपियन शुगर्स ८२ लाख, गोकुळ शुगर्स २२.६७ कोटी, मातोश्री लक्ष्मी शुगर्स २०.३९ कोटी, शिवरत्न उद्योग २.७६ कोटी, बबनराव शिंदे १२.२५ कोटी, सीताराम महाराज ३.१५ कोटी, जयहिंद शुगर ९१ लाख, विठ्ठल रिफाईंड १५.१४ कोटी. 


या कारखान्यांनी दिली पूर्ण रक्कम 
संत शिरोमणी, पांडुरंग सहकारी, श्री विठ्ठल, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते बी. पाटील, जकराया शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ ३ व गोकुळ माऊली या ९ कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला आहे. इतर २२ कारखान्यांकडे २४८ कोटी रुपये थकीत आहेत. 

 

शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा
चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी १ कोटी ६९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एफआरपी कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे, असे आदेश असताना अद्याप जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. ज्या कारखान्यांनी ऊस बिलाची रक्कम अदा केली नाही, त्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. 


जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी ऊस बिलाच्या जोरावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करतो, पैसेच कारखान्यांकडून न आल्याने सर्व व्यवहार, लग्नकार्य यांचे नियोजन कोलमडले. शेतकरी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करूनही साखर आयुक्तालयाने कारखानदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. फक्त कारखानदारांना नोटिसा काढल्या जात आहेत. आठ दिवसांमध्ये साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊसबिल जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा, गाईच्या दुधास प्रतिलिटर ५० रुपये, म्हशीच्या दुधास ७० रुपये दर मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनामध्ये वसंत गायकवाड, उमाशंकर पाटील, पोपट साठे, राजेंद्र लांडे, नरेंद्र पाटील, अ.रजाक मकानदार, इक्बाल मुजावर, विजय भालेराव, विलास अरवत, संगप्पा अळगी आदींचा सहभाग होता. 

बातम्या आणखी आहेत...