आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विजय शुगरची' विक्री निविदा काढण्यास संचालकांची मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवरत्न उद्योग समूहाच्या करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगरची संपूर्ण मालमत्ता विक्री करण्यासाठी निविदा काढण्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी मंजुरी दिली. गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय झाला. त्याचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आहे. मूल्यांकनाचा आकडा ठरला, की कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही निविदा काढण्यात येईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. 


मध्यवर्ती बँकेने हा कारखाना उभारणीसाठी ११३ कोटी ६० लाख ७५ हजार रुपयांचे मुद्दल कर्ज दिले. त्यावर आतापर्यंत ६५ कोटी ५४ लाख १८ हजार रुपयांचे व्याज झाले. एकूण १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपयांची कारखान्याकडे बँकेची थकबाकी अाहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेने कायदेशीर लढा दिला. 'सरफेसी' कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा बँकेच्या ताब्यात दिला. त्यानंतर ही विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. पुण्याच्या वकिलामार्फत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येईल. त्यानंतर जाहीर निविदा प्रसिद्ध होणार असल्याचेही श्री. पाटील म्हणाले. 


गुरुवारी झालेल्या बैठकीसाठी संचालक उपस्थित होते. त्यांच्या पुढे एकूण २४ विषय होते. आयत्या वेळच्या विषयांमध्ये विजय शुगरच्या विक्रीचा प्रस्ताव होता. त्यावर चर्चा होऊन लगेच मंजुरी देण्यात आली. या सभेसाठी मोजकेच संचालक उपस्थित होते. आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, संचालक सुरेश हसापुरे, भारत सुतकर आदींचा त्यात समावेश होता. 


इतर विषय अन् निर्णय 
१. इर्ले (वैराग, ता. बार्शी) येथील आदित्यराज शुगरसह इतर संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी तीन ते चारवेळा जाहीर लिलाव पुकारला होता. त्याला प्रतिसाद नसल्याने हा विषय पुन्हा संचालकांच्या सभेत आला. त्यांचा पुन्हा लिलाव होणार. 
२. वैयक्तिक कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर करण्याचा निर्णय झाला. गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी वैयक्तिक मध्यम मुदत कर्ज धाेरणात सुधारणा आणि बदल करण्याच्या या विषयावर संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. 


विजय शुगरची ४२ एकर जमीन आहे. मशिनरी आणि इतर सामग्रीचे मूल्यांकन करण्यास दिले असून, त्याचा आकडा ठरला, की तितकी रक्कम बँकेला मिळणे अपेक्षित असते. 
- के. व्ही. मोटे, सरव्यवस्थापक 

बातम्या आणखी आहेत...