आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळमध्ये दरोड्यातील संशयितांचा पोलिसांवर हल्ला; एक नागरिक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा व वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले. मंगळवारी (दि. १३) रात्री आठच्या सुमारास येथील शिवाजी चौकात हा थरार घडला. यातील एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जखमींपैकी दोन पोलिसांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अबूतालीब पाशाभाई कुरेशी (वय ४०, रा. मोहोळ) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. सचिन मागाडे, लालसिंग राठोड, रामनाथ बोंबीलवार, समीर खैरे, सचिन गलांडे, विजय जाधव अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. मागाडे व बोंबीलवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 


स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी या घटनेची माहिती दिली. गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री दरोडेखोरांनी सोड्डी येथील पाच घरे फोडून कस्तुरबाई रामण्णा बिराजदार (वय ६५) यांचा खून केला होता. मलकाप्पा बिराजदार यांना गंभीर जखमी केले होते. पोलिस निरीक्षक कुंभार यांचे पथक तीन दिवसांपासून आरोपींच्या शोधात होते. मंगळवारी संशयित दरोडेखोर मोहोळ परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि काही पोलिस कर्मचारी संशयितांचा शोध घेत होते. उर्वरित पान १२ 


रात्री आठच्या सुमारास तिघे संशयित हे येथील शिवाजी चौकात एका दुचाकीवर आढळले. त्यांना पाहताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. मात्र, दरोडेखोरांनी सचिन मागाडे, सचिन गायकवाड, रामनाथ बोंबीलवार, समीर खैरे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. भरचौकातील या घटनेने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरोडेखाेरांनी पळून जाताना चारभाई मंझिल, दत्तनगर येथील रस्त्यावर उभे अबूतालीब कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी कुरेशी यांचा उपचारांसाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. झटापटीत तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. मोहोळचे सचिन गलांडे, विजय जाधव हे दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. पोलिसांचे पथक संशयित ज्या दिशेने गेले त्या दिशेने रवाना झाले. शीघ्र कृतिदलाचे पथकही संशयितांचा शोध घेत आहे. 


पोलिस अधीक्षकांकडून विचारपूस 
पोलिसांच्या हल्ल्यात अबूतालीब कुरेशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. जखमी पोलिसांमुळे अश्विनी रुग्णालयात पोलिसांची गर्दी होती. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी अश्विनी आणि शासकीय रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. 


लोकांची सुरक्षितता महत्त्वाची होती 
 भर चौकात ही घटना घडली. त्यामुळे आमच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची होती. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्याव्यतिरिक्त आम्हाला कोणतीही कृती करता आली नाही. 
- विजय कुंभार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण  


जखमींची रुग्णवाहिका धडकली, दोघे जखमी 
या हल्ल्यातील जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची वडवळ फाट्याजवळ एका दुचाकीला धडक बसली. या अपघातात किसन प्रल्हाद माने आणि वाघमारे ही महिला जखमी झाले. वाघमारे या गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे. ़


...तर दोन पोलिसांचा जीव गेला असता 
संशयित चाकू घेऊन गोंधळ घालत होते. इतर दोन पोलिसांवर हल्ला करत असताना राठोड यांनी संशयिताला पकडले. तो संशयित हाताला चावा घेऊन पळून गेला. राठोड यांनी त्याला वेळीच पकडले नसते तर दोन पोलिसांचा जीव गेला असता, असे जखमींनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...