आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी आंदोलनाचा इशारा, सायंकाळी दलित वस्तीच्या २५ कामांना जम्बो मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर लगेच हालचाल दाखवत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेत दलितवस्ती विकास योजनेच्या २५ कामांना जम्बो मंजुरी दिली. तरीही आंदोलन करणारच असल्याचे चंदनशिवे यांनी स्पष्ट केले. 


गेल्या काही दिवसांपासून श्री. चंदनशिवे हे दलित वस्ती विकास कामांवरून भाजपवर शरसंधान करीत अाहेत. सोमवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांवर टीका केली. तीन महिन्यात एक बैठक कायद्यानुसार घेणे आवश्यक असताना, जून २०१७ पासून बैठकच घेतली नाही. दलितवस्तीची कामे करणे आवश्यक असताना पालकमंत्री जाणूनबुजून कामे घेत नाहीत, असा थेट अारोप त्यांनी केला. ग्रामीण भागातील कामे मंजूर केली. पण शहरातील कामे थांबवली, असाही आरोप केला. 


पालकमंत्र्यांच्या विरोधात मंगळवारी सकाळी ११ ते २ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात येणार आहे. त्यानंतरही निधी दिला नाही तर टप्याटप्याने आंदोलन करण्यात येईल. शहरातील दलित वस्तीत जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येईल. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन, रास्ता रोको आणि महामोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, स्वाती आयवळे आदी उपस्थित होते. 


५९ पैकी २५ कामांना पालकमंत्र्यांची मंजुरी 
नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील १४ कोटी रुपयांची ५९ कामे प्रस्तावित केली होती. यापैकी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी २५ कामांना मंजुरी दिल्याची माहिती प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे, उपअभियंता चंदरगी, सहायक अभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते. मागील बैठकीत अपूर्ण प्रस्ताव असल्याने महापालिका क्षेत्रातील एकाही कामांना मंजुरी दिली नव्हती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री देशमुख यांनी महापालिका हद्दीतील ५९ पैकी २५ कामांना मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावातील त्रुटी दूर करून पुढील बैठकीत ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले. 


लोकशाहीत त्यांना आंदोलनाचा अधिकार 
शहरातील दलित वस्ती निधीचे महापालिकेने प्रस्ताव पूर्णपणे दिले नव्हते. पुन्हा प्रस्ताव मागवले. बैठक घेऊन मंजूर करू. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करू दे. नागरिकांना माहिती आहे कोण काम करतोय.
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 

बातम्या आणखी आहेत...