आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप २० व्या दिवशी सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी गुरुवारी बैठक घेतली. त्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली. परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देऊ शकत नाही, अशी भूमिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी घेतली. परिवहनला निधी देणे असेल तर नगरसेवकांच्या विकासकामास कात्री लावावी लागेल, असे मत मांडले. बैठक निष्फळ ठरली. माकपच्या वतीने आंदोलन सुरूच राहणार, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत असून, त्यांना अडवण्याचा प्रयत्न माकपकडून होणार आहे.
महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बुधवारी महापौर बनशेट्टी यांनी बैठक घेतली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे, परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के, नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगावकर, कामिनी आडम अादी उपस्थित होते. परिवहनबाबत तोडगा काढा, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रक्कम द्या, अशी मागणी करण्यात आली. परिवहन विभागात अनावश्यक कर्मचारी आहेत. ३० बस दुरुस्तीसाठी कर्मशाळा विभागात ११० कर्मचारी आहेत. तेथे अनावश्यक कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज नसताना तेथे ठेवले, अशी हकीकत आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी मांडली. परिवहन सेवकांच्या वेतनासाठी महापालिका पैसे देणार नाही. त्यांना बजेटमध्ये तरतुदीप्रमाणे ८० टक्के निधी दिला. वेतनासाठी निधी देणे असेल तर नगरसेवकांच्या विकास कामास कात्री लावावी लागेल, असे मत आयुक्तांनी मांडले. तेथे कर्मचारी गैरव्यवहार करत असतील तर त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा मुद्दा परिवहन सभापती मस्के यांनी मांडला. महापौरांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. परिवहनच्या बाबतीत कोणताच तोडगा न काढता बैठक संपली.
परिवहनवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना अडवणार
परिवहनच्या बाबतीत तोडगा काढावा या मागणीसाठी लाल बावटा युनियनच्या वतीने गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना अडवणार असल्याचे माकपच्या नगरसेविका आडम यांनी सांगितले. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरले. मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू नये म्हणून पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
शासनाकडील प्रलंबित प्रश्नांसाठी पदाधिकारी सीएमना देणार निवेदन
महापालिकेचे विविध प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. मनपा झोन समिती, नगर अभियंता नियुक्ती, मनपा गाळे प्रश्न, शासनाकडून अधिकारी नियुक्त आदी मागण्यांचा समावेश आहे.
परिवहनच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना भेटणार
परिवहनच्या प्रश्नाबाबत तोडगा काढावा याबाबत भाजप, शिवसेना सदस्यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचे बैठकीत ठरले आहे.
- शोभा बनशेट्टी, महापौर
समांतर जलवाहिनी मंजूर केल्याने सत्कार करणार
शहरासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी शासनाने ४३९ कोटींची योजना मंजूर केल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह महापालिका पदाधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.