आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारस इस्टेटचा 50 वर्षांचा करार संपल्याने ताब्यात घेणार : आयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेत २४.४१ गुंठे (अर्धा एकरपेक्षा अधिक) जागेत पारस इस्टेट असून, यात सुमारे ७९ गाळे आहेत. महापालिकेच्या मालकीची ही जागा ५० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत १९ डिसेंबर २०१७ रोजी संपत असून, महापालिकेने भाडेकरूस नोटीस देऊन जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 


नवी पेठेतील पारस इस्टेट परिसर प्रसिद्ध आहे. महापालिकेच्या मालकीची ही जागा २० डिसेंबर १९६७ रोजी राजगोपाल रामचंद्र उपाध्ये आणि पारसलाल जयराम जोशी यांना ५० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली होती. उपाध्ये आणि जोशी यांनी या जागेची मागणी अर्ज १४ सप्टेंबर १९६७ रोजी केला होता. त्यानुसार १३ डिसेंबर १९६७ च्या ठरावानुसार भाडेकरारावर ही जागा देण्यात आली. हा करार करत असताना सुमारे १३ अटी घालण्यात आल्या. 


करारात बांधकामासह इमारत महापालिकेस विनाअट परत करेन, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. १९६७ पासून २५ वर्ष दरमहा १८ हजार रुपये भाडे, त्यानंतर २५ वर्षे २१ हजार रुपये भाडे देण्याचे करारात नमूद करण्यात आले. पारस इस्टेटमध्ये सध्या सुमारे ७९ गाळे आहेत. त्या जागेवरील भाडे भाडेधारक घेत आहेत. या कराराची मुदत १९ डिसेंबर २०१७ रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेने जागा भाडेकरूंना यापूर्वी नोटीस दिली. त्यानंतर उपाध्ये जोशींसह चौघांनी मुदतवाढीचा अर्ज केला. तो अर्ज महापालिकेने दप्तरी दाखल केला आहे. 


राजगाेपाल उपाध्ये आणि पारसमल जोशी यांच्याबरोबर महापालिकेने पन्नास वर्षापूर्वी करार केला होता. त्यामध्ये "प्रचलित कायद्यानुसार महापालिका जे भाडे ठरवेल ते भाडे देऊन जागा पुढे ताब्यात ठेवता येईल.' असे स्पष्ट म्हटले आहे. त्यानुसार गाळेधारकांना मुदतवाढ देणे गरजेचे आहे. तसेच भाडेवाढीसाठी महापालिकेने आम्हाला चर्चेसाठी बोलवावे. आम्ही नियमानुसार जी भाडेवाढ असेल ती द्यायला तयार आहोत. महापालिकेने नियमानुसार काम करुन आम्हाला सहकार्य करावे. आमचे सर्व व्यापार आणि संसार यावरच अवलंबून आहे. महापालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
- ओमप्रकाश बारड, अध्यक्ष, पारस इस्टेट व्यापारी असोसिएशन 


जागा ताब्यात घेणार 
पारसइस्टेटच्याजागेची मुदत कराराप्रमाणे १९ डिसेंबर रोजी संपत असून, ती जागा महापालिका ताब्यात घेईल. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. 
- डाॅ.अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त 


कोट्यवधी किमतीची जागा 
कोट्यवधी किमतीची मनपाची जागा असून, तेथे असलेल्या गाळ्यास शहरात सर्वाधिक भाडे आहे. तेथे वाणिज्य संकुल असून, त्यामुळे महापालिकेस दरमहा सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळेल. 


न्यायालयात कॅव्हेट 
जागेची मुदत संपल्याने महापालिका जागा ताब्यात घेणार आहे. त्यासाठी काही अडचण येणार नाही. मात्र खबरदारी म्हणून महापालिकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याची माहिती आहे. 


चौपाटीची जागा रिकामी करू 
चार पुतळा मागे चौपाटी असून, तेथे वारंवार गाडी लागत आहेत. तेथील गाड्याबाबत आराखडा तयार करून सभागृहाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान तेथे गाड्या लागल्या तर कायमस्वरूपी गाडी लागणार नाही. त्यानुसार कारवाई करू, असे महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...