आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत कामगार संघटना, महापौर व परिवहन व्यवस्थापक यांच्याशी चर्चा झाली. चर्चेनंतर परिवहन कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत पालिकेने सर्वपक्षीय समिती नियुक्त करावी व तोडगा काढावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिल्या. यावर कामगार संघटना व महापौर यांनी सहमती दर्शवली. दोन दिवसात यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले.
मंगळवारी परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, व्यवस्थापक अभिजित हराळे आदी उपस्थित होते. परिवहन कर्मचाऱ्यांचे गेल्या ९ महिन्यांपासून वेतन झाले नाही. या पार्श्वभूमीवर लाल बावटा सोलापूर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
बैठकीत पालिकेने केलेल्या ठरावानुसार समिती गठित करावी आणि त्यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शिंदे यांनी केल्या. यावेळी युनियनचे सचिव व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, तौफिक शेख, सुधाकर मारडकर, अय्यूब शेख, महिबूब शेख, संजय कामटे, श्रीनिवास येदूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा
परिवहन कामगारांचा प्रश्न चिघळला आहे. कामगारांच्या असंतोषाचा स्फोट होईल. २७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या आधी परिवहन कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली नाही लावला तर परिवहन कर्मचारी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवतील, असा इशारा नरसय्या आडम यांनी दिला.
दोन दिवसांत मार्गी लावणार
परिवहन कामगारांचे पगार देण्यासाठी महापालिकेची तयारी आहे. याबाबत महापालिकेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व विरोधी पक्षनेते या सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यात येईल. कामगारांचे थकीत वेतन व इतर प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावले जाणार असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.