आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत दुहेरी जलवाहिनीवर होणार चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात हाेणार आहे. तीत १४ विकासकामांवर चर्चा होणार आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचा विषय प्रमुख आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक होईल. यापूर्वीची बैठक १२ जून रोजी झाली होती. 


कंपनी शहराच्या मध्यवर्ती भागातील १०२४ एकर परिसराचा विकास करत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २८६ कोटी निधी कंपनीस प्राप्त झाला. कंपनीने विकास आराखडा तयार केला आहे. त्यापैकी स्मार्ट रस्त्याचे काम सुरू आहे. ६९२ कोटींच्या दुहेरी जलवाहिनीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात मंजुरी देतो, असे म्हणाले. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने प्राधान्य देत चर्चेत पहिला विषय घेतला. पण त्या जलवाहिनीच्या प्रस्तावास महापालिका सभागृहाने मंजुरी अद्याप दिली नाही. त्या विषयाची सभा तहकूब करण्यात आली आहे. 


उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी महापालिका सभागृहाकडे पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित असताना भाजपतील अंतर्गत राजकारणामुळे तो प्रस्ताव सभागृहात अडकला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनास शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यास अडचण येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील आठवड्यात दुहेरी जलवाहिनी प्रस्ताव मंजूर करतो, असे सांगितले पण अद्याप ते शासनाकडे गेले आहे. सोमवारी होणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी प्रस्ताव आहे. 


होम मैदानाची दुरावस्था 
होम मैदान येथे अाजोरा टाकण्यात येतो. ते टाकू नये म्हणून महापालिकेने दोन बाजूने खड्डा खोदला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूच्या रस्त्याने वाहने आत येत नाहीत. आपतकालीन रस्त्याच्या बाजूने वाहने येऊन तेथे अाजोरा टाकतात. यापूर्वी महापालिकेच्या वतीने तेथे कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले होते. पण तेथे पसरणाऱ्या दुर्गंधीचा त्रास जिल्हाधिकारी कार्यालयास होऊ लागल्याने तेथील केंद्र बंद करण्यात आले. 


या कामांची प्रगती 
रंगभवन चौक येथे सुशोभीकरण व रंगभवन चौक ते मराठा मंदिर प्रवेशद्वार पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. महापालिका, न्यायालय परिसर, सिद्धेेश्वर मंदिरासमोर परिसरात ई टाॅलेट बसवण्यात आले. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, महापालिका येथे शहराची माहिती सांगणारे किऑस्क बसवण्यात आले. 


या विषयावर होणार चर्चा 
उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी प्रस्ताव, स्मार्ट सिटी भागात पाणीपुरवठा सुधारणा, रंगभवनचे स्मार्ट चौक व रंगभवन ते डाॅ. आंबेडकर चौक रस्त्याच्या कामाचा आढावा, लाइट अॅण्ड साउंड शो, सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम सुधारणा, नाईट मार्केट, शहरातील बसवण्यात येणारे एलईडी लाइट, शासकीय कार्यालयावर बसवण्यात येणारे सोलर रूफ टाॅप, घनकचरा व्यवस्थापन, ई टाॅयलेट बसवणे, महापालिका उद्यान विभाग सुधारणा, होम मैदान सुशोभीकरण, हुतात्मा बाग व आखाडा सुशोभीकरण. 


ही कामे अद्याप सुरूच नाहीत 
स्मार्ट सिटी भागात पाणीपुरवठा सुधारणा करणे, लाइट अॅण्ड साउंड शो, सिध्देश्वर तलाव सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम सुधारणा, नाईट मार्केट, शहरातील बसवण्यात येणारे एलईडी लाइट, शासकीय कार्यालयावर बसवण्यात येणारे सोलर रूफ टाॅप, हुतात्मा बाग. 

बातम्या आणखी आहेत...