आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापूर गर्भपात : फरार दोशी डॉक्टर दांपत्याला निपाणीत अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी दहा दिवसांपासून फरार डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी यांना वेळापूर पोलिसांनी गुरुवारी निपाणी (जि. बेळगाव) येथून अटक केली. शुक्रवारी त्यांना माळशिरस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वेळापूर (ता. माळशिरस) येथील आनंद मॅटर्निटी आणि सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये ११ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने छापा टाकून अवैध गर्भपात होत असल्याचे उघडकीस आणले होते. या रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. चार बॉक्स मुदतबाह्य औषधसाठा व गर्भपात करण्याच्या मशीन जप्त केल्या होत्या. या प्रकरणी ११ जूनला मध्यरात्री दीड वाजता वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करतेवेळेस ठाण्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन डॉ.आनंद दोशी तर रुग्णालयात महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या निगरणाीखाली असलेल्या डॉ. जयश्री दोशी या दोघांनी पळ काढला होता. 


अकलूजचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी १२ जून रोजी वेळापूर पोलिस ठाण्याला भेट देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली होती. 


दहा दिवसांत शोध 
तपास पथकांनी गेली दहा दिवस अकलूज, मुंबई, तिरुपती, बंगळुरू, कराड अशा विविध ठिकाणी जाऊन तपास केला. परंतु या डॉक्टर दांपत्याने पोलिसांना गुंगारा देत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना खबऱ्यांकडून डॉक्टर दांपत्य निपाणी (जि. बेळगाव) येथील श्री क्षेत्र स्तवनिधी ब्रह्मदेव दिगंबर जैन मंदिरात असल्याची माहिती मिळाली. वेळापूर पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जाऊन डॉक्टर दांपत्याला अटक केली. या पथकात हेडकाँस्टेबल लक्ष्मण पिंगळे, भागवत झोळ, दत्ता खरात, अमोल वाघमोडे व अश्विनी पवार यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...