आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीची निवडणूक मुदतीत पूर्ण होण्याची शंकाच; प्रारूप मतदार याद्या तयार होण्यास विलंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उच्च न्यायालयाने सोलापूर व बार्शी बाजार समितीची निवडणूक १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मतदान घेण्याची प्रक्रिया सुरूही करण्यात आली. मात्र अद्याप प्रारूप याद्याच तयार न झाल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल का ? याविषयी शंका आहे. निवडणूक कार्यालयाने १ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले होते, ५ फेब्रुवारी झाले तरी अद्याप मतदार याद्याच तहसीलदारांकडून प्राप्त झाल्या नाहीत. यामुळे निवडणुकीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 


एकीकडे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना बाजार समितीसाठी निवडणूक अधिकाऱ्याचाही शोध सुरू आहे. सोलापूर व बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी घ्यावी लागत असल्याने दोन स्वतंत्र उपजिल्हाधिकारी नियुक्त करावे लागणार आहेत. 


उपविभागीय अधिकारी क्रमांक २ ज्योती पाटील या दीर्घ रजेवर गेल्याने या कार्यालयाचा पदभार उपविभागीय अधिकारी क्रमांक १ शिवाजी जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बार्शी बाजार समितीसाठी शिवाजी जगताप यांची नियुक्ती केल्यास सोलापूर बाजार समिती निवडणूकीसाठी कोणत्या अधिका ऱ्यांची नियुक्ती करायची ? हा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे. निवडणुकीचा चांगला अनुभव असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे व मागील महिन्यात भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झालेले भारत वाघमारे ही दोन नावे समोर आहेत. वाघमारे यांनीच मागील निवडणूक प्रक्रिया राबविली होती. मात्र श्री. वाघमारे यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही. बाजार समितीची निवडणूक सहकारमंत्री यांच्या प्रतिष्ठेची असल्याने अनुभवी अधिकाऱ्यांकडेच जबाबदारी सोपवावी लागणार आहे. यामुळे आता सोलापूर बाजार समितीसाठी निवडणूक अधिकारी कोणाची निवड करतात? हे पहावे लागेल. 


४० दिवस शिल्लक, पूर्ण होणार का प्रक्रिया? 
मुदत पूर्ण होण्यासाठी ४० दिवस शिल्लक आहेत. याय ४० दिवसांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीपासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर करणे या कार्यक्रमांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर व बार्शी बाजार समितीची प्रारूप मतदार प्रसिद्धी, मतदार यादीवर हरकती मागवणे, प्राप्त हरकतींची सुनावणी घेऊन अंतिम मतदार प्रसिद्धी करणे याचा समावेश आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, अर्ज माघार व मतदान, निकाल याचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम आणि प्रत्यक्षात मतदार यामध्ये किमान दोन आठवड्यांचा कालावधी असणे अपेक्षित आहे. यामुळे ४० दिवसात दोन्ही बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल का? यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. 

बातम्या आणखी आहेत...