आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आश्वासक समारोप; सोलापूरकरांना केले समृद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. प्रभात व उमा चित्रपटगृहात आयोजित या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेल्या आशयपूर्ण चित्रपटांनी सोलापूरकरांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलं. 


'सर्वनाम' ही कलाकृती रविवारी प्रभात टॉकीजमध्ये सादर झाली. न बदलणाऱ्या सर्वनामाप्रमाणं आपण शाश्वताचा ध्यास घेऊन जगलं पाहिजे हा बोध या चित्रपटातून झाला. भारतीय तत्वज्ञानामध्ये मृत्यू हा विषय नवीन नाही. जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे नाणं अज्ञाताकडून हवेत उडवलं जातं. त्यावेळी त्या नाण्याची होणारी भिंगरी म्हणजे आपलं जीवन. मनासारखं दान पडलं तर जन्म-आनंद-सुख. मनाविरुद्ध दान पडलं तर मृत्यू अटळ असतोच. तिथंपर्यंत होणारी फरपट आणि शेवटी मृत्यू अशी एक खिळवून ठेवणारी कलाकृती रसिकांना भावली. 


भारतीय संस्कृतीत जातिव्यवस्था हा एक कलंक आहे. प्रस्थापित आणि शोषित यांच्यामधील दरी अजूनही कायम आहे. 'क्राय ह्यूमॅनिटी' या चित्रपटात हा विषय सम्यक दृष्टीने हाताळण्यात आला. शोषित समाजातील एका व्यक्तीच्या प्रेतयात्रेला प्रचलित मार्गावरून न जाऊ देण्याचा निर्णय प्रस्थापित घेतात. त्यामुळे त्या समाजाची फरपट होते. हा गंभीर विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला गेला. 


'वाईल्ड टेल्स'मधील सहा वेगवेगळ्या कथांमधून दिग्दर्शकानं नियती आणि कर्म याबाबतचं सुंदर सूत्र उलगडलं. स्टुडंट सेक्शनमधील शॉर्ट फिल्म्समधून तरुण पिढीची नव्या युगामधील जगाकडे बघण्याची दृष्टी कळली. महोत्सवातील सर्वच चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण चांगले विषय मांडले गेले. 


महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, आदित्य गाडगीळ, मंजिरी जोरापूरकर, दीप्ती राजे आदींनी परिश्रम घेतले. 


कलाकारांसमवेत रंगल्या गप्पा 
सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रविवारचे आकर्षण ठरला तो म्हणजे 'पळशीची पी.टी.' या मराठी चित्रपटाचे. ग्रामीण भागात आजही मुलींचे लग्न अल्पवयातच लावले जाते. तिला कोणतेही निर्णय स्वातंत्र्य न देता तिची महत्त्वाकांक्षा चिरडली जाते. नेमक्या याच गंभीर समस्येवर 'पळशीची पी.टी.'ने अचूक बोट ठेवले. दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांच्यासह या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...