आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरावच्या शेतकऱ्याने सादर केले नटसम्राटचे चार हजार 575 प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- बारावी नापास असताना आणि अभिनयाचे कोणतेही शिक्षण नसतानाही खैराव येथील फुलचंद जरीचंद नागटिळक या शेतकऱ्याने नटसम्राट या एकपात्री नाटकाचे आतापर्यंत चार हजार ५७५ प्रयोग सादर केले आहेत. ते या माध्यमातून नातेसंबंधाची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते संत गाडगेबाबा यांच्या वेशात ग्रामस्वच्छतेविषयी प्रबोधन करत आहेत. 


नागटिळक यांची पावणेपाच एकर शेती आहे. त्यावरच कुटुंबाचा गाडा हाकत अभिनयाची कला जोपासत आहेत. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घरातून धूम ठोकून परभणी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली होती. तेव्हा तेथे लक्ष्मण देशपांडे, वऱ्हाडकर यांनी द्विपात्री नटसम्राट सादर केले होते. तेथेच त्यांनी गावोगावी हा नाट्यप्रयोग करण्याचा निर्धार केला. त्यांनी देशभरात हा प्रयोग सादर केला. कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचे नटसम्राट हे नाटक आजही रसिकमनात घर करून आहे. त्यावर मराठी चित्रपटही निघाला. मात्र, नागटिळक यांनी हे नाटक वाड्यावत्यांवर पोहोचवले आहे. 


कलेसाठी वाहून घेतलेल्या नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांच्यासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी, ताणतणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी खंबीर स्त्री कावेरी या पात्रातून साकारली गेली. नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची, पण नटसम्राट नाटकामध्ये कावेरीने मात्र मुलांना शिक्षण विचारांनी समृद्ध बनवले. नागटिळक यातील सहाही व्यक्तिरेखा साकारत हे नाट्य दीड तासात उभे करतात. या तुफानाला घर देता का घर... या प्रसंगातून ते रसिकमनांना जिंकतात. यासाठी मिळेल ते मानधन स्वीकारतात. ते खैराव गावात १९९६ पासून ग्रामीण साहित्य संमेलन भरवत आहेत. याबद्दल ४० हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. 


गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार 
हातात झाडू, डोक्यावर कफनी अशी संत गाडगेबाबा यांच्यासारखी वेशभूषा करून नागटिळक हे ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पुढे रस्ता झाडतात. गावोगावच्या शाळा, साहित्य संमेलनात जाऊन त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करतात.

 
मी पुणेयेथे कुसुमाग्रज यांची भेट घेऊन गावोगावी नटसम्राट पोहोचवण्यासाठी परवानगी घेतली. त्यानंतर त्याच्या सादरीकरणाला सुरुवात केली. २५ वर्षांपासून मराठी साहित्य संमेलनाला जातो. यातून वैचारिक समृद्धी मिळाली. अंदमान निकोबार, कर्नाटक, गोवा येथील मराठी भाषक भागात नटसम्राट सादर केला. लवकरच माझे पाऊलखुणा हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
- फुलचंद नाग टिळक, खैराव, ता. माढा 

बातम्या आणखी आहेत...