आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात बाल्कनीचा भाग कोसळून चिमुकलीचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरात बुधवारी अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. अनेक ठिकाणी झाडे पडली. घरांची पडझड झाली. भवानी पेठेत घराचा सज्जा पडून त्याखाली चेंगरून एका बालिकेचा मृत्यू झाला. दिव्या गजानन गजेली असे तिचे नाव आहे. विद्युत तारा तुटून शॉर्टसर्किट झाल्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा ही बराचवेळ खंडित होता. 


सोलापुरात बुधवारी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवघ्या तासाभरात दोन इंच म्हणजे ५५ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तसेच पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नुकसानी संदर्भात नागरिकांचे फोन येत होते. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती, ती सुरळीत करण्याचे काम सुरू होते. शहराच्या सखल भागात पाणी साचले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जवळपास ३०० ते ४०० झाडांच्या फांद्या तुटल्या तर ५० च्या आसपास छोटी मोठी झाडे उन्मळून पडली. जय मल्हार चौक, बुधवार पेठ आदी भागातील झोपडपट्टीमध्ये घरांत पाणी साचले होते. 


जिल्ह्यातही थैमान 
सुस्ते (ता. पंढरपूर) आणि पापरी (ता. मोहोळ) परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. तुंगत, तारापूर, मगरवाडी, नारायण चिंचोली, ईश्वरवठार, अजनसोंड, बिटरगाव या गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. घरावरचे व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. काही घरांवर झाडे कोसळली. त्यामुळे घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंढरपूर-तिऱ्हे-सोलापूर मार्गावर सुस्ते -बिटरगाव दरम्यान धनगरवाडीजवळ मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. विद्युत ताराही तुटून पडल्या.

 
आजीकडे आली होती दिव्या 
दिव्या गजानन गजेली ही १० वर्षीय बालिका या पावसाचा बळी ठरली. सुटीत ती आपल्या आजीकडे आली होती. पावसात अचानक आजीच्या घराचा सज्जा तुटला. तो आणि बाजूची भिंत दिव्याच्या अंगावर कोसळली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...