आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - जम्मूच्या कठूआमधील आठ वर्षीय बालिकेवर दुष्कर्म आणि उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म घटनेचा निषेध करत शहरातील सर्व समविचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी मूक धरणे करत महाआक्रोश व्यक्त करण्यात आला. "पिडीतों को इन्साफ दो, गुन्हेगारोंको फाशी दो...' अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कुल जमाअती तंजीमच्या अध्यक्षतेखाली सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन केले. तोंडावर काळी रिबीन बांधून, हातात मागणीचे फलक घेऊन हजारो सर्वधर्मीय लोक आंदोलनात सहभागी झाले होते. प्रारंभी मुफ्ती इब्राहिम आणि मौलाना हारीस यांनी मूक आंदोलन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन करून सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले. रखरखत्या उन्हात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
काही प्रमाणात महिला व तरुणींनी आपला सहभाग नोंदवला. आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर उपस्थित हजारो जण शांततेत, शिस्तीत परतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक, मुख्य प्रवेशद्वार, ब्रम्हदेवदादा सहकारी बॅँक, बेगमपेठला जाणारा रस्ता हा सर्व परिसर नागरिकांनी भरून गेला होता.
या संघटनांचा होता आंदोलनात सहभाग
शुक्रवारी झालेल्या आंदोलनास राष्ट्रवादी पार्टी, जवाब दो आंदोलन कृती समिती, मराठा सेवा संघ, भटके विमुक्त संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानवी हक्क अभियान, सत्यशोधक परिवार, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, संभाजी ब्रिगेड, परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संषर्घ समिती, दलित स्वयंसेवक संघ, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळ आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावून पाठिंबा दिला.
व्यासपीठावरील चिमुकल्या मुली
व्यासपीठावर मधुरा माशाळकर, पालवी कांबळे, सादिया शेख, उजमा शेख, मुनज्जा शेख, शिफा शेख, अल्समा बहिरामडगी, अफनान कोथिंबिरे, जोया नदाफ, सना शेख या लहान मुलींची प्रमुख उपस्थिती होती. या मुलींनी तोंडावर काळी पट्टी लावली होती. आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांना या मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
आंदोलनानंतर रस्त्यावर स्वच्छता माेहीम
आंदोलनात नेटके नियोजन पाहायला मिळाले. आंदोलन स्थळी मॅट अंथरणे, वर पडदा मारणे, स्टेज उभा करणे आदी सोय करण्यात आली. नगरसेवक रियाज हुंडेकरी, मतीन बागवान, शौकत पठाण यांच्या मित्र परिवाराच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली होती. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पाऊच देण्यात येत होते. आंदोलनानंतर रस्त्यावर पडलेले पाणी पाऊच उचलण्यात आले. रस्त्यावर कचरा होऊ नये किंवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून हे स्वयंसेवक वाहतूक पोलिसांच्या सोबत राहून सहकार्य करत होते. दुष्कर्म प्रकरणाबाबतच जवाब दो आंदोलन कृती समितीने या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेतली. यावेळी महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.