आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपूर्वी पत्नीचा खून, गायब पती पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पत्नीचा खून करून गायब असलेल्या पतीला अाज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. बाबूराव शिवप्पा कोळी (सोलापूर) याला दोन महिन्यांनी अटक झाली अाहे. महादेवी बाबूराव कोळी यांचा मृत्यू झाला होता. रिक्षा घर घेण्यासाठी माहेरहून पैसे अाण म्हणून पत्नीशी नेहमीच भांडण करीत होता. 


३१ अाॅक्टोबर रोजी महादेवी यांच्यावर दगडी वरंवटा डोक्यात घालून हल्ला केला होता. उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. फौजदार चावडी पोलिसात महादेवी यांचे भाऊ अनिल मनोहर कोणे (रा. सम्राट चौक, सोलापूर) यांनी तक्रार दिली होती. घटनेपासून बाबूराव गायब होता. तो अाज दुपारी जुना िवजापूर नाका भागात फिरत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई सहायक निरीक्षक वैभव माळी, हवालदार सायबण्णा कमळे, नाना उबाळे, मंजुनाथ मुत्तनवार या पथकाने केली. 


जैन साधकांवर हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह १८ निर्दोष 
दीक्षा समारंभासाठी नागपूर येथे निघालेल्या जैन साधकांवर देगाव येथे प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून पुराव्याअभावी अठरा जणांची निर्दोष मुक्तता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी केली. 


माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे, सुरेश बोरकर, शिवानंद कोरे, विठ्ठल चोतवे, विठ्ठल कस्तुरे, शिवराम कस्तुरे, नागनाथ कोठे, प्रशांत कांबळे ( कोळी), योगेश कोळी, उमेश कोळी, अजित गायकवाड, सचिन भुईटे, चैतन्य जाधव, धोंडोपंत आतकरे, दत्ता डोके, शेरू भुईटे, अशोक कस्तुरे, उमेश गायकवाड (रा. देगाव परिसर) यांची मुक्तता झाली. आदगोंडा पाटील ( म्हैसाळ, ता. मिरज) यांनी सलगरवस्ती पोलिसात तक्रार दिली होती. ऑगस्ट २०१३ रोजी हा प्रकार घडला होता. पाटील यांच्यासह २४ सहकारी दीक्षा समारंभासाठी सांगली येथून नागपूरकडे टेम्पो ट्रॅव्हलर बस (एमएच ०९ / सीए३७९०) मधून निघाले होते. देगाव जवळ आल्यानंतर बसला ट्रॅक्टरचा (एमएच१३/जे७४२८) धक्का लागला. त्यावरून सगळेजण बसमधील सर्वांवर हल्ला केला. वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. सरकारतर्फे प्रकाश जन्नू, आरोपीतर्फे अॅड. व्ही. डी. फताटे, फिर्यादीतर्फे महेश जगताप यांनी काम पाहिले. 


नीलमनगर भागात जुगार खेळताना सहा जणांना अटक 
नीलमनगर भाग तीन येथे एका जागेत जुगार खेळताना सहा जणांना अटक झाली. प्रभाकर चंद्रकांत करणकोटी, राकेश विठ्ठल कणकी, अमर दशरथ देशपती, शिवशरण भीमाशंकर बाबा, विजय साईनाथ मिठ्ठा, श्रीकांत विठ्ठल कणकी यांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. ही कारवाई रविवारी रात्री झाली. अंदाजे अडीच हजार रुपयांंचा एेवज जप्त करण्यात अाला अाहे. 


फौजदारावर खुनी हल्ला प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर 
हातभट्टी दारू अड्यावर छापा मारण्यासाठी गेल्यानंतर फौजदारावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. अार. उगले यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. किरण श्रीमंत राठोड, सागर श्रीमंत राठोड (रा. दोघे मुळेगाव तांडा) यांच्यावर सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अॅड. शिव झुरळे यांच्यामार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील म्हणून संतोष न्हावकर यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...