आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांनी फोडली प्रश्नपत्रिका, तरीही जुजबीच कारवाई कशी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जे प्राध्यापक विद्यापीठ परीक्षेसाठी पेपर सेटिंग करतात, तेच प्राध्यापक आपल्या महाविद्यालयातील सराव परीक्षेसाठी तोच पेपर देतात, यातून परीक्षेतील गैरप्रकार वाढीस तर लागले आहेतच. पण विद्यापीठाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. पेपर सेटर यांनी सराव परीक्षेत जाणूनबुजून विद्यापीठासाठी सेट केलेली प्रश्नपत्रिका सराव परीक्षेसाठी उपलब्ध करून दिल्यास त्या प्राध्यापकावर तीन वर्षे बंदी घालण्यात येते. मोठा आर्थिक दंडही लावला जातो. मात्र तरीही प्राध्यापक मंडळी पेपर फोडण्याच्या प्रकारात सहभागी होत असतील तर मात्र आणखी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. 

 

विद्यापीठ परीक्षेसाठी प्रत्येक अभ्यासक्रमाचे तीन प्रश्नसंच तीन वेगवेगळ्या महाविद्यालयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून उपलब्ध करीत असते. यातील एक प्रश्नपत्रिका अंतिम परीक्षेसाठी गोपनीय पद्धतीने निवडली जाते. त्यामुळे अंतिम परीक्षेला कोणती प्रश्नपत्रिका असेल याची कल्पना खुद्द त्या प्राध्यापकांनाही नसते. दरम्यान महाविद्यालयाच्या सराव परीक्षा होतात. त्यात हे प्राध्यापक आपणच सेट केलेली प्रश्नपत्रिका आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सरावासाठी देतात. 


विद्यापीठ हतबल 
'हिराचंद नेमचंद'च्या प्राध्यापकाने फोडला बीबीएचा पेपर 
बीबीए द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा पेपर... परीक्षा पार पडली... मात्र संगमेश्वर महाविद्यालयातील बीबीएमधील विद्यार्थ्यांना हा प्रकार परीक्षेनंतर लक्षात आला. हीच प्रश्नपत्रिका हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील बीबीएमधील विद्यार्थ्यांना सराव परीक्षेदरम्यान देण्यात आली होती. याची विद्यापीठाकडे रीतसर तक्रार देण्यात आली. हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयातील सराव परीक्षेतील प्रश्नपत्रिका व विद्यापीठ सत्र परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकाच प्राध्यापकांनी सेट केलेली असल्याने तीच प्रश्नपत्रिका होती.

 
प्रकरण लॅप्सेस समितीकडे 
परीक्षाविषयक कामातील चुकांच्या प्रकरणाची चौकशी विद्यापीठाची लॅप्सेस समिती करीत असते. आता हे प्रकरण या समितीकडे सोपवण्यात येईल. यापूर्वी सिंहगड कोर्टी महाविद्यालयातील प्राध्यापकाने मॅथ्स विषयाचा सेट केलेला पेपर आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सरावासाठी दिला होता. त्या प्रकरणातील प्राध्यापकावर तीन वर्षे परीक्षाविषयक कामकाजावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आर्थिक दंडही लागू करण्यात आला आहे. 


चूक एकदा नाही, दोन पेपरमध्ये 
हिराचंद नेमचंदच्या पेपर सेटरने एक नाही तर दोन प्रश्नपत्रिका सेट केल्या होत्या. दोन्ही पेपर सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले. योगायोगाने म्हणा की, दुर्दैवाने. त्याच प्रश्नपत्रिकांचा संच अंतिम परीक्षेत आला. साहजिकच हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. 
तीन वर्षे बॅन, आर्थिक दंडाची तरतूद कागदावरच, विद्यापीठातील प्राध्यापकांकडून मास कॉपीचा प्रकार, सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर होतोय अन्याय 


प्रश्नपत्रिका फोडल्याचे सिद्ध झाल्यास होते कारवाई 
परीक्षाविषयक कामात चुका केल्या तर काय होईल? असे प्राध्यापकांना वाटत असेल तर ती चुकीची समजूत आहे. सेट केलेली प्रश्नपत्रिका जाणीवपूर्वक फोडल्याचे लक्षात आले तर बंदी लागू होते. पेपर सेटरने जर सेट केलेल्या प्रश्नपत्रिकेची गोपनीयता बाळगली नसेल किंवा ही प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारात सामील असेल व हे कृत्य सिद्ध झाले तर त्यास परीक्षाविषयक कामे करण्यावर बंदी घालण्यात येते. पूर्वी एका परीक्षेपुरती होती. आता कमीत कमी तीन वर्षे बंदी घालण्यात येते. तसेच आर्थिक दंडही लावण्यात येतो. 


या पुन्हा होणार परीक्षा 
बीबीए - सत्र चौथे 
विषय - इंटरनॅशनल बिझनेस 
परीक्षा तारीख - १७ एप्रिल २०१८ 
बीबीए - सत्र चौथे 
विषय - ऑर्गनायझेशन बिहेवियर 
परीक्षा तारीख - १९ एप्रिल २०१८ 


कॉलेज स्तरावरही चौकशी समिती नेमली 
पेपर सेटरने गोपनीय पद्धतीने कामकाज करणे अपेक्षित आहे. त्याने कोणती प्रश्नपत्रिका विद्यापीठाला सीलबंद स्वरूपात दिली आहे. याची माहिती कोणालाही असण्याचे कारण नाही. ती प्रश्नपत्रिका सराव परीक्षेतही देणे अपेक्षित नाही. हा नैतिकतेचा भाग असतो. कॉलेजचे नाव या प्रकरणात आल्याने कॉलेज स्तरावरही चौकशी समिती नेमण्यात आली आहे. योग्य ती कारवाई पेपर सेटरवर होईल.'' डॉ. संतोष कोटी, प्राचार्य, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय 


तीन वर्षे बंदी व दंड लागू शकतो 
पेपर सेटरने सेट केलेल्या पेपरची गोपनीयता बाळगली नाही तर अशा पेपर सेटरवर तीन वर्षे बंदी व आर्थिक दंड लागू शकतो. अर्थात विद्यापीठाची लॅप्सेस समिती याबाबतचा चौकशी करून या निर्णयाची शिफारस केल्यानंतर विद्यापीठ तशी कारवाई करते.'' बी. पी. पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन समिती, सोलापूर विद्यापीठ 


गोपनीयता बाळगणे आवश्यक 
प्राध्यापकांनी पेपर सेट केल्यानंतर त्याची गोपनीयता बाळगली पाहिजे. हा कोड ऑफ कंडक्टचा भाग आहे. ही आचारसंहिता आहे. त्याचे उल्लंघन प्राध्यापकांनी हाेऊ देऊ नये. उल्लंघन केल्यास परीक्षाविषयक काम करण्यावरच बंदी घालण्यात येते. ही शिक्षाही कडक स्वरूपातील असते.'' डॉ. गणेश मंझा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ 


पेपर सेटरवर कडक कारवाई करण्यात यावी 
पेपर सेट करणारे प्राध्यापक मनमानी पद्धतीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. अापल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहेत. प्राध्यापकांनी पेपर सेट केल्यानंतर त्यातील संभाव्य प्रश्न काही विद्यार्थ्यांना सांगणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. अशा पेपर सेटरवर विद्यापीठाने कडक कारवाई करावी. ज्यातून असे प्रकार पुन्हा घडू शकणार नाहीत.'' लहू गायकवाड, अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...