आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण पडाल यांनी आत्महत्या करण्याची सूचना देऊनही पोलिस गाफील होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'म्होरक्या' चित्रपटाचा निर्माता कल्याण पडाल याने आत्महत्येपूर्वी दोन दिवस अगोदरच (१५ मे) पोलिस आयुक्तांना तक्रारी अर्ज दिला होता. त्यात खासगी सावकारांची नावे, पत्ते आणि मोबाइल क्रमांकही दिले होते. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास केला असता तर कदाचित कल्याणचा जीव वाचला असता. परंतु, अर्ज दिल्यानंतर ४८ तास होऊनही पोलिस गाफील राहिले. त्यामुळेच अपंग, कॅन्सरग्रस्त कल्याणला जगाचा निरोप घ्यावा लागला. 


'म्होरक्या' निर्मात्याची आत्महत्या खासगी सावकाराच्या तगाद्याने' ही बातमी रविवारी 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झाली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्तांच्या नावे दिलेला तक्रारी अर्ज त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी 'दिव्य मराठी'ला दिला. या दोन पानी अर्जात कल्याणने तपशीलवार त्याची करुण कहाणी मांडली आहे. 'मी जन्मापासूनच पोलिअोग्रस्त अपंग आहे. विवाहित असून तीन मुले आहेत. माझ्या कर्करोगाची माहिती वडलांना कळली. त्याचा धक्का बसून १८ एप्रिल रोजी म्हणजेच महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. दरम्यान, कर्करोगावरील उपचारासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले. सावकारांनी घेतलेल्या रकमेच्या कैकपटीने पैसे मागत होते. नाही दिल्यास हातपाय तोडून बायको, मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होते. त्यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही.' 


कल्याण पडाल यांच्या मृत्यूबाबत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. पोलिस अायुक्तालयात तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे तो अर्ज जातो. चौकशी होते. पडाल यांचे निवेदन व नातेवाइकांच्या तक्रारीनुसार पुढील कार्यवाही होईल. संबंधितांवर गुन्हे दाखल करू.
- महादेव तांबडे, पोलिस अायुक्त 


कोण आहेत सावकार? अन् काय केले त्यांनी? 
१.
श्रीनिवास संगा (रा. विजयनगर, न्यू पाच्छा पेठ) याने जानेवारी २०१७ मध्ये १ लाख रुपये व्याजाने दिले होते. चक्रवाढ व्याजदराने त्याने ९ लाख रुपयांची मागणी केली. दमदाटी करून इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे धनादेश घेतले. १५ मे २०१८ रोजी त्यावर संमतीविना सह्या घेतल्या. 

२. संतोष नारायण बसुदे (रा. इंदिरानगर) याने सप्टेंबर २०१६ मध्ये १ लाख रुपये व्याजाने दिले होते. जानेवारी २०१८ मध्ये ११ लाख रुपये गाळे खरेदीपोटी दिल्याचे लिहून घेतले. कल्याणच्या नावाने गाळा आहे. तो त्यांच्या वडलांनी त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाने मिळवून दिले होते. 
(या दोन्ही बाबी कल्याण पडाल यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद आहेत.) 

बातम्या आणखी आहेत...