आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- एकीकडे सहकारमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना सोबत घेऊन सोमवारी केलेला कार्यक्रम आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र अाणण्यासाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेल्या बैठका म्हणजे आगामी लोकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत अापले राजकीय गड मजबूत करण्यासाठीचीच धडपड असल्याचे दिसत आहे. त्याची रंगीत तालीम म्हणूनच बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जात अाहे.
शेतमाल तारण कर्जाचे धनादेश देण्याचा कार्यक्रम सोमवारी सकाळी सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे मंगल कार्यालयात झाला. कार्यक्रमाचे हे निमित्त होते. प्रत्यक्षात समितीच्या निवडणूक प्रचाराचा जणू नारळच फोडण्यात आला. श्री. देशमुख यांच्या बोलण्यातून बाजार समितीच्या निवडणुकीची तयारीच दिसून अाली.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, "बाजार समिती कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही. तो गैरसमज काढून टाकावा. मला निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पणन कायद्यात बदल केल्याचा आरोप होत आहे. माझी भीती असणाऱ्यांना सांगावेसे वाटते, की जोपर्यंत शेतकऱ्यांची सत्ता येत नाही, तोपर्यंत मी बाजार समितीत पाय ठेवणार नाही. काही स्वार्थी लोकांना खड्यासारखे बाजूला करण्यासाठीच सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा केला. हे चुकीचे झाले का?"
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, इंद्रजित पवार, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, चनगोंडा हविनाळे, रजनी भडकुंबे, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, समिती प्रशासक सुरेश काकडे आदी उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये एकीकरणाचे प्रयत्न
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजशेखर शिवदारे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे यांच्यातील मनभेद दूर करून बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरमधील नेत्यांचे मनोमिलन घडविण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी जनवात्सल्यवर बैठका घेतल्या. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे दक्षिणचे पालकत्व सोपवले. म्हेत्रे उत्साही दिसत आहेत. मात्र प्रश्न अाहे तो शिवदारे अाणि दिलीप माने मनापासून एकत्र येतात का याचा. ते दोघे जर एकत्र अाले तरच काँग्रेसला बाजार समिती राखता येईल अाणि पुढे दक्षिण सोलापूरमध्ये लढता येईल.
उक्तीत स्तुतिसुमने, कृतीतून मात्र वेगळेच
पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अापल्या भाषणांमध्ये एकमेकांवर कधी नव्हे ती स्तुतिसुमने उधळली. महापालिकेतील गट-तटसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गंभीर इशारा दिल्यानंतर दोन देशमुख एका मंचावर दिसले. परंतु मंचावर बसल्यानंतर एकमेकांचे तोंडही बघितले नाही, हे विशेष. सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यावेळीही अशीच प्रचिती अाली. सुभाष देशमुख हे नगरसेवकांना घेऊन मंदिरात अाले, पण पालकमंत्री सोबत नव्हते, ते नंतर अाले. त्यानंतर भोजनाच्या गोड कार्यक्रमात ते एकत्र होते. पण त्यांच्यातील देहबोली वेगळेच सांगत होती.
कोणाच्या बापाबद्दल बोलताहेत, हे माहित नाही : दिलीप माने
सहकारमंत्र्यांच्या वक्तव्याविषयी माजी आमदार दिलीप माने यांना विचारले असता, 'कुठलीही संस्था कुणाच्याच बापाची नसते. सभासदच त्याचे खरे मालक असतात. सरकार दरबारी त्याची नोंदणी असते. खात्यांचे नियंत्रण असते. परंतु गेल्या दीड वर्षात पाहिले तर बाजार समिती सरकारच्या बापाचीच झाल्याचे दिसून येईल. सहकारमंत्र्यांना माझ्या बापाबद्दल खूप आदर होता. आता कुणाच्या बापाबद्दल बोलताहेत माहीत नाही, असा प्रतिटोला त्यांनी लगावला. मंत्री देशमुख यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. श्री. माने म्हणाले, "बाजार समितीच्या निवडणूक निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे एकत्र आले. त्यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले. त्यामुळे मंत्र्यांना बोलण्याचा मुद्दा सापडत नाही. म्हणून ते बाप शोधत असावेत. बाजार समितीवर आतापर्यंत वि. गु. शिवदारे, बाबूराव चाकोते अनेक वर्षे सभापती होते. त्यांनीही कधी मक्तेदारी सांगितली नाही. बाजार समितीच्या स्थापनेत माझ्या वडिलांचा संबंधच नाही. त्यामुळे माझ्या बापाची प्रॉपर्टी समजण्याचा प्रश्नच नाही. याचा अर्थ कुणाला कसा घ्यायचा आहे, तसा घ्यावा."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.