आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले होते सगळे आलबेल, पालकमंत्री गटाचे नगरसेवक पुन्हा गैरहजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि केंद्रीय मंत्री िनतीन गडकरी सोलापुरात अाले होते, त्यावेळी त्यांनी सोलापूर महापालिकेत काहीच घडलेले नाही, सर्व काही अालबेल अाहे असे सांगितले होते त्याला चारच दिवस झाले. आज पुन्हा महापालिकेत विजय-सुभाष गटातल्या बेदिलीचे दर्शन झाले. 


पालिका सभेत पालकमंत्री गटाच्या सदस्यांनी गैरहजेरी लावली. तरीही विरोधकांना हाताशी धरून सहकारमंत्री गटाच्या भाजप सदस्यांनी कामकाज चालविले अाणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडी पार पाडल्या. सभागृहनेतेपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही, मात्र नागेश वल्याळ यांनी विषयांचे वाचन केले. त्यामुळे दोन्ही देशमुख गटातील वादाला अाणखी फोडणी मिळाली अाहे. 


स्थायी समितीच्या अाठ रिक्त जागांच्या निवडीसाठी मनपाची सभा शनिवारी दुपारी पार पडली. त्यात भाजपमध्ये स्थायी समिती सदस्य अाणि सभागृह नेता निवडीतही काही अालबेल दिसले नाही. सभागृहातील विषयाचे वाचन कोण करणार हा कळीचा मुद्दा होता, त्यामुळे पालकमंत्री गटाच्या ३५ नगरसेवकांनी सभागृहाकडे पाठदाखविली. मग सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांनी विरोधकांना हाताशी धरून निवडी झाल्याचे जाहीर केले. गटबाजी पुन्हा उफाळली असून अाता नवीन वादाला तोंड फुटले अाहे. महापौरांवर अारोप होत अाहेत. तर प्रदेश भाजप नेतेही अाळी मिळी गुप चिळी करून राहील्याने वेगळाच पेच निर्माण झाला अाहे. 


महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. भाजप वगळता इतर पक्षांनी स्थायीसाठी नावे निश्चित केली होती. मात्र भाजपकडून सभा सुरुवात होईपर्यंत नावे जाहीर केली नाही. यावरून भाजप प्रदेश कमिटी सुध्दा या दोन्ही गटामध्ये एकोपा आणण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येते. बोलावणे आले नाही म्हणून पालकमंत्री गटाचे ३५ नगरसेवक सभागृहनेत्यांच्या कार्यालयात बसून होते. सहकारमंत्री गटाचे नगरसेवकांच्या उपस्थितीत सभेस सुरुवात झाली. 


नगरसेवक नागेश वल्याळ यांनी आणलेला लखोटा महापौर शोभा बनशेट्टी यांनी वाचून दाखविला. यामध्ये पालकमंत्री गटाने सुचवलेल्या चार पैकी शिवानंद पाटील आणि राधिका पोसा यांच्या नावाला कात्री लावण्यात आली. दोन प्रशासकीय प्रस्ताव दाखल करून घेऊन दुखवटा वाचून सभा तहकूब करण्यात आली. सभा संपल्यानंतर पालिकेच्या आवारात शिवसेना पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

 

प्रदेश कमिटीने दिलेली नावे जाहीर केली नाहीत 
भाजपच्या चार सदस्यांची नावे प्रदेश पातळीवर निश्चित करण्यात येतात. त्यानुसार प्रदेश पदाधिकारी रवी अनासपुरे यांनी महापौरांच्या मोबाइलवर अनेकवेळा फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी स्थायी सभापती संजय कोळी आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांना फोन केला. फोनवरून त्यांनी नावे जाहीर केली. याबाबतची कल्पना देण्यासाठी नगरसेवक बोगडे हे अनासपुरे यांचा फोन घेऊन महापौरांकडे गेले. तेव्हा महापौरांनी फोन घेतला नाही. महापौर बनशेट्टी यांनी मनमानी पद्धतीने नावे जाहीर केली असा आरोप करत पालकमंत्री गटाने केला. तसेच सभागृहात वेगळ्या गटाने बसणार असल्याचे सभापती संजय कोळी यांनी सांगितले. यावर मला कोणाचाही फोन आला नाही, पक्ष अध्यक्षांनी दिलेला लखोटा वाचून दाखवल्याचे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. 


तातडीच्या विषयाला सेनेचा आक्षेप 
भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या औषधोपचारास ३० ते ३२ लाख रुपये खर्च आला असून त्यांना २० लाखांपर्यंतची मदत महापालिकेने करावी. त्यांच्यावर विष प्रयोग केल्याचा संशय असून त्याची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी. शिवरायांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदम याच्यावर कडक कारवाई व्हावी आणि भाजपचा निषेध व्यक्त करण्याचा तातडीचा सभासद प्रस्ताव आनंद चंदनशिवे यांनी मांडला. यावरून महेश कोठे यांनी हरकत घेतली आणि तातडीचा सभासद प्रस्ताव मांडता येत नाही, पुरवणी अजेंड्यामध्ये हा विषय घेण्याऐवजी तातडीचा प्रस्ताव आणून राजकारण करता का, असा टोला दिला. सुरेश पाटील यांना राज्य सरकार कडून २० लाखांची मदत द्या, अशी मागणी अॅड. यू. एन. बेरिया यांनी केली. 


पाटलांसाठी नगरसेवक देणार महिन्याचे मानधन 
सुरेश पाटील यांना मदत करायलाच हवी यामध्ये दुमत नाही. मात्र रीतसर काम करा. शासनाकडून मदत तर घेऊच. प्रथम सर्व नगरसेवकांनी आपापले एक महिन्याचे मानधन द्यावे, अशी मागणी महेश कोठे यांनी केली. यावर महापौर शोभा बनशेट्टी यांनी पहिला मी देते व सर्वांनीसुद्धा द्यावी, तसेच राज्य सरकारकडे सुद्धा मदतीसाठी प्रयत्न करते, असे सांगितले. 


हे सदस्य झाले बिनविरोध 
भाजपचे जुगनबाई अंबेवाले, विनायक विटकर, सुभाष शेजवाल, राजश्री कणके, सेनेचे गणेश वानकर, भारत बडूरवाले, राष्ट्रवादीचे किसन जाधव तर एमआयएमच्या ताैफिक शेख यांची निवड एकमताने करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...