आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांच्या खालीच अंधार: अनावश्यक उ(ध)जळपट्टी, अावश्यक ठिकाणी अंधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अनावश्यक ठिकाणी दिवेच दिवे अन् अनेक रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असे चित्र सध्या सोलापूर शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत दिसते अाहे. ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील विविध भागातील पथदिव्यांची रात्रीच्या वेळी पाहणी केली असता हे चित्र समोर अाले. शहरात १२ हजारांवर पथदिवे अाणि खांब अाहेत, पण तेवढा उजेड मात्र दिसत नाही. 


विडी घरकुल, सेटलमेंट, विजापूर रोड भागातील नगरोत्थान योजनेतून झालेल्या रस्त्यांवर नव्याने पथदिवे बसविले अाहेत. तेथे पूर्वीचे विद्युत पोल असताना पुन्हा नव्याने उभारून अनावश्यक खर्च केला गेला. केवळ त्याच रस्त्यावर उजेडच उजेड अन् तेथून थोडे पुढे गेले की, विद्युत पोल नाहीत किंवा असलेल्या पोलवर दिवेही नाहीत. त्यामुळे अंधारच अंधार असे चित्र दिसते अाहे. 


शहरातील हद्दवाढ भाग असलेल्या गुरुनानक चौक ते नई जिंदगी हा तीन किमीचा रस्ता नगरोत्थान योजनेतून करण्यात आला आहे. कुमठा नाका ते नई जिंदगी या रस्त्यावर नई जिंदगीकडे जाताना काही ठिकाणी डाव्या तर काही ठिकाणी उजव्या बाजूला पथदिवे आहेत. सोयीनुसार पथदिवे बसविले आहेत. अमन चौकाच्या अलीकडील बाजूस पथदिवेच नाहीत. याच रस्त्यावर जुने पोल तसेच आहेत. यामुळे रहदरीस अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्याचा दुसरा टप्पा असलेल्या साईनाथ नगर ते मजरेवाडीकडे जाणारा रस्ता पथदिव्यांनी उजळून निघाला आहे. या रस्त्यावर १०० पेक्षा अधिक पथदिवे आहेत. कुमठा नाका ते मजरेवाडी या रस्त्यावर पथदिवे बसवताना मक्तेदाराने सोयीनुसार काम केले आहे. याठिकाणी किती पथदिवे बसविले आहेत, कधी बसविले आहेत, याचा कोठेही फलक दिसत नाही, त्याची देखभाल, दुरुस्ती कोण करणार ? हे दिसत नाही. 

 

दुसरा रस्ता डी मार्ट ते बंथनाळमठ, टाकळीकर मंगल कार्यालय असा रस्ता आहे. रस्त्यावर खड्डे आहेतच. पथदिव्यांची अवस्थाही वेगळी नाही. या रस्त्यावर साेडिअम वेपरचे ४५ ते ५० पथदिव्यांचे खांब आहेत. त्यातील २० पथदिवे पूर्ण बंद अवस्थेत आहेत. काही पथदिव्यांवर वेली चढल्या आहेत. काही पथदिवे चालू असले तरी लोंबकळत आहेत. जे चालू आहेत त्यांचा उजेडही पुरेसा नाही. 


तिसरा रस्ता इंचगिरी मठ ते राजस्व नगर हा रस्ता. ड्रेनेजसाठी रस्ता खाेदाईनंतर नवा रस्ता बनवण्यात आला. पथदिव्यांचे आकर्षक खांब आहेत. त्यावर दिवेही लावले आहेत. फक्त ते दिवे पूर्ण बंद आहेत. सुमारे ७५ पथदिव्यांच्या रांगेतील एकही दिवा चालू नाही. माशाळवस्ती क्रॉसिंग रोड भागात काही पथदिवे चालू असतात. पण पुढे राजस्व नगरापर्यंत किर्र अंधारच. एका बाजूला जंगल, दुसऱ्या बाजूला वसाहती असे वातावरण आहे. 


पहिला रस्ता सैफुल ते नवीन आयएमएस हा ७० फुटी रस्ता आहे. यात सोडियमच्या ८० पथदिव्यांचे खांब आहेत. सर्व पथदिवे चालू अवस्थेत. उत्तम प्रकाश आणि नेटके पथदिवे हा एक सुखद धक्का आहे. संपूर्ण रस्त्यावर केवळ एक ते दोनच पथदिवे बंद. बाकी पथदिवे उत्तम आणि चालू स्थितीत. 


जुळे सोलापूर हा शहरातील महत्त्वाचा निवासी परिसर. येथील दिवाबत्ती, रस्ते, ड्रेनेज, मंडई आदी नागरी प्रश्न नेहमीच चर्चेत असतात. मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू यांच्या अनेक वसाहती याच परिसरात आहेत. प्लॉटधारक, सोसायटी आणि अपार्टमेंट यांच्या संमिश्र वसाहतीचा हा भाग असल्याने तीनही रस्त्यांच्या तीन तऱ्हा आढळल्या. 


जुना विजापूर नाका ते सैफुल 
परिसरातीलकाही दिवे बंद आहेत. हायमास्ट दिवा सुरू असलेल्या चौकात मात्र पथदिवे बंद आहेत. पण, हायमास्टमुळे तिथे पुरेसा उजेड असतो. अत्तार नगर चौक परिसरात पथदिवे बंद असल्याने तो संपूर्ण भाग अंधारमय आहे. 


आयटीआय चौकात हायमास्ट अन् पथदिवे एकत्रितच 
सातरस्ताते सैफुल या मार्गावर महापालिकेचे ९७ पथदिवे आहेत. त्यापैकी बहुतांश दिवे रात्री बंद असल्याने महा‘अंधार’मार्ग झाला आहे. कारीगर पेट्रोल पंपाजवळ विजापूर होटगी रस्त्यावरील वाहतूक एकत्र येते. त्या ठिकाणी महापालिकेने बसवलेला हायमास्ट दिवा बंदच असतो. नियोजित महसूल भवनसमोरील वळणरस्त्यावरील दोन दिवे सुरू अाहेत. संभाजी तलावसमोरील रस्ता दुभाजकांमध्ये बसलेल्या दिव्यांचा प्रकाश झाड फांद्यामुळे रस्त्यावर व्यवस्थित पडत नाही. 

बातम्या आणखी आहेत...