आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहितेंच्या विजय शुगर कारखान्याची मालमत्ता अखेर जिल्हा बँकेकडेच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच सुपूर्द करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा निर्णय दिला. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून बँकेकडे मालमत्ता सोपवल्याचे पंढरपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या ताब्यातील शिवरत्न उद्योग समूहाचा हा कारखाना आहे. त्याने जिल्हा बँकेकडून ११३ काेटी रुपयांचे कर्ज घेतले. २०१२ मध्ये त्याची उभारणी झाली. दोन गळीत हंगाम करून कारखान्याचा पट्टा पडला. पुढे कारखान्याचा भोंगा वाजलाच नाही. दुसरीकडे जिल्हा बँकेने दिलेले कर्ज थकले. ११३ कोटींचे कर्ज व्याजासह १८३ कोटींपर्यंत पोहोचले. त्याच्या वसुलीसाठी बँकेने अनेक वेळा नोटिसा बजावल्या. परंतु कारखान्याच्या संचालकांनी त्याची दाद घेतली नाही. कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण असल्याने 'सिक्युरिटायझेशन अॅक्ट'खाली त्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला. त्यानंतर 'सरफेसी' कायद्यानुसार प्रत्यक्ष ताबा द्यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. त्यावर सुनावणी झाली. तब्बल अडीच वर्षांनी बँकेच्या बाजूने निकाल मिळाला. 


बँकेचा मोठा 'विजय'
विजय शुगर आणि खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर या दोन्ही कारखान्यांचे साधारण ४०० कोटी रुपये बँकेकडे थकीत आहेत. दोन्ही कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. विजय शुगरचा गुंता वाढलेला होता. शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्यासाठी साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पंढरीच्या तहसीलदारांनी लिलावाची तारीख ठरवली. त्याच दिवशी बँकेने मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना बँकेचे म्हणणे घेण्यास सांगितले. त्यानुसार सुनावण्या झाल्या. त्यात 'विजय' बँकेचाच झाला. मोहिते-पाटील यांच्या विरोधातील हा निकाल ठरला. 

बातम्या आणखी आहेत...