आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेचे बरडे ‘जनवात्सल्य’वर; शिंदेंना म्हणाले, लोकसभेला तुम्हीच उभे राहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे मंगळवारी सकाळी अचानक सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘जनवात्सल्य’वर गेले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत विचारले असता, ते म्हणाले, “शिवसेनेचे विरोधक असलेल्या नारायण राणेंना आमचे कोणीही ‘कोठे’ही भेटतात. मी शिंदे यांची भेट घेतली तर गैर काय..?” अर्थातच त्यांचा रोख जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यावर होता, हे काही लपू शकले नाही. 


सोलापूरच्या विकासासाठी शिंदे यांनीच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनवणी केल्याचेही श्री. बरडे म्हणाले. आमच्यासाठी तुम्हीच युवा उमेदवार आहात, असे म्हणत "साहेब शिवसेनेचे, मी साहेबांचा..' अशी घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर शिंदे बरडे यांच्यात गुप्तगू झाली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माऊली पवार उपस्थित होते. 


कोठेंना शह देण्यासाठी
राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी कोठेंनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राणेंनी शिवसेनेचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख माझ्या संपर्कात असल्याचे सांगितले. त्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कोठे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून ‘मातोश्री’वर संपर्क वाढवला होता. त्याने त्यांचा ‘सहसंपर्क’ तुटला. या स्थितीत कोठेंना शह देण्यासाठीच बरडे जनवात्सल्यवर गेल्याचे बोलले जाते. 


विमानतळाविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र 
बोरामणी विमानतळ आंतरराष्टीय दर्जाचे विमानतळ बनविण्यासाठी मी केंद्रात मंत्री असतानाच जागा संपादित केली होती. त्याचे पैसे दिले. कुंपण घालण्यात आले. राज्य शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात बोरामणी विमानतळाचा विकास करण्यासाठी करारदेखील झाला. सर्व कामे केली असताना आता केवळ त्यांच्या ताेंडात घास घालणे एवढेच शिल्लक राहिले होते. असे असताना गेल्या साडेतीन वर्षात बोरामणी विमानतळाचे काम रखडलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसापूर्वी पत्र लिहिले. विमानतळाचे काम तातडीने पूर्ण करावे, असेही त्यात नमूद केले.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री 


नरेंद्र मोदींच्या एवढ्या सभा? 
श्री.शिंदे चार दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची निवड गुजरात निवडणुकांबाबत ते बोलले. देशात यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने एवढ्या जाहीर सभा राज्य निवडणुकीत घेतल्या नव्हत्या. तब्बल २८ सभा झाल्या. त्यातील भाषा अशोभनीय आहे. 

बातम्या आणखी आहेत...