आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल घरफोड्या अटकेत, 33 ताेळे सोन्यासह 8 लाखांचा ऐवज जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरासह बार्शी, पंढरपूर व सांगोला आदी ठिकाणी घरफोड्या व अन्य चोऱ्यात संशयित असलेल्या अट्टल चोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल आठ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


आरोपी लिंबाजी चव्हाण (वय ३३, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शहरात झालेल्या घरफोड्यांच्या आठ गुन्ह्यातील ३३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३७ तोळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच चार मोटारसायकली असे एकूण १० गुन्हे त्याने केले असून त्याला सापळा रचून बाळीवेस येथे पकडण्यात आले. या प्रकरणातील अजून एक आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे. चव्हाण हा या दागिन्यांपैकी दोन तोळे दागिने गहाण ठेवण्यासाठी नान्नज येथे जात हाेता. तेव्हा त्याला पकडण्यात आले. 


रात्रीच्या वेळी बंद घर शोधून तो घरफोडी करीत होता, असे आयुक्तांनी सांगितले. फौजदार चावडी परिसरात युवराज मोरे यांच्या घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यावर सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी तपास करून हे प्रकरण उघडकीस आणले आहे. हा सराईत गुन्हेगार असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी गाेकुळ मवारे यांच्या घरफोडीचा गुन्हादेखील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्याकामी ही लवकर शोध लागेल असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेच्या शर्मिष्ठा घारगे, पोलिस उपायुक्त विशेष व गुन्हे शाखा पौर्णिमा चौगुले, पाेलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह तपास कामातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...