आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी मनपाच्या चार शाळांमध्ये विज्ञान केंद्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनपा शाळेत स्मार्ट टीव्ही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, टॅब, ज्ञानरचनावादी वर्ग रचना, पारंपरिक खेळ, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य यांच्या माध्यमातून शिकणे-शिकवणे होत होते. शासनाकडून मिळालेल्या चार नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रामुळे भर पडली आहे. विज्ञान केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार अाहे. 


सर्व शिक्षा   अभियानातून शासन व राज्य शिक्षण परिषदेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र राज्यामधील काही शाळांमध्ये २०१७-१८पासून उभारण्याचे नियोजन केले. त्याचाच एक भाग प्राथमिक शिक्षण मंडळाच्या एकूण चार शाळांना ही केंद्र मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्प, मुलांची मराठी शाळा क्र. ४, मुलांची शाळा क्र.२, डीएसके शाळा विनायकनगर आदींचा समावेश आहे. प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची उभारणी केली. 


या साहित्याचा आहे समावेश 
या विज्ञान केंद्रामध्ये एकूण ३४३ प्रकारचे प्रयोग व १५० प्रकारचे चार्ट आहेत. काही साहित्य गणिताचेदेखील आहे. असे एकूण ५२० प्रकारचे साहित्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक एलईडी टीव्ही असून त्यामध्ये संपूर्ण प्रयोगाची माहिती दाखवली जाईल. नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये साधारण विद्युत घंटी, मानवी बॅटरी, विद्युत चक्रव्यूह, तरंगता चेंडू, रंगीत छाया, न्यूटनची तबकडी, दिवस व रात्र, कृत्रिम उपग्रह, पवनचक्की, पाण्याचा भवरा, डीएनए मॉडेल, शोभा दर्शक, ध्वनी संवेदक, आकर्षक थॉमाट्रोप, बल व त्याचे प्रकार, कोनीय संवेग चाक हे आहेत. 


विज्ञान केंद्रामध्ये ३४३ प्रयोग व १५० प्रकारचे चार्ट 
या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इ १ ली ते इ ७वी च्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञानाची भीती दूर व्हावी, तसेच मनपा शाळांचा पट व उपस्थिती वाढणार आहे. मनपा शाळांमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण विज्ञान व गणित विषयाचे शिक्षण मिळणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक भगवान मुंडे व फय्याज शेख यांनी दिली.
विज्ञान केंद्रामुळे अनुभवातून शिक्षण घेता येईल. निर्माण होणाऱ्या समस्या व विविध शास्त्रज्ञांची व त्यांनी लावलेल्या संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागून भावी संशोधक निर्माण होतील. संगीता जाधव, मुख्याध्यापक, मुलांची केंद्र शाळा क्र. २ 

बातम्या आणखी आहेत...