आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमंगलच्या संचालकांनी ७४.८२ कोटी रुपये गुंतवणूकदारांना व्याजासह परतीचे सेबीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज आणि त्याच्या सात संचालकांनी गुंतवणूकदार शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ७४.८२ कोटी रुपये १५ टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) दिले आहेत. त्याशिवाय परतफेड केल्यानंतर चार वर्षांसाठी शेअर आणि रोखे बाजारात गुंतवणुकीस सातही संचालकांवर बंदी घातली आहे. हा आदेश सेबीने बुधवारी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. 


लोकमंगल व त्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांकडून निधी उभारताना कंपनी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका 'सेबी'ने ठेवला. कंपनीचे संचालक सौ. स्मिता सुभाष देशमुख, वैजनाथ नागप्पा लातुरे, अाैदुंबर संदिपान देशमुख, शहाजी गुलचंद पवार (भाजपचे जिल्हाध्यक्ष), गुरण्णा अप्पाराव तेली, महेश सतीशचंद्र देशमुख आणि पराग सुरेश पाटील यांच्यावर सेबीने कारवाई केली आहे. सेबीच्या आदेशानुसार या कंपनीने २००९ ते १० आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उभारताना कंपनी कायदा आणि आयसीडीआर (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता देणे) विनिमयच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे सेबीने म्हटले अाहे. त्यामुळे लोकमंगल व ७ संचालकांना शेतकऱ्यांकडून गोळा केलेले पैसे १५ टक्के व्याजदराने परत करावे लागतील. 


पैसे राष्ट्रीयकृत बँकेतील स्वतंत्र खात्यात भरण्याचे बंधन सेबीने घातले आहे. गुंतवणूकदारांना पैशाचा परतावा बँकेच्या माध्यमातूनच करावा लागेल. सातही संचालकांनी त्यांच्या मालमत्तेची, बँक खात्यांची व पैसे गुंतवणुकीची माहिती देण्याचे बंधन सेबीने घातले आहे. संचालकांनी त्यांची मालमत्ता परतफेड होईपर्यंत विकू नये तसेच फेडीनंतरही चार वर्षासाठी शेअर बाजारात गुंतवणुकीवर बंदी घातली आहे. पैसे कसे परत करणार, याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी. आदेशपूर्तीचा अहवाल सेबीला द्यावा, असेही सेबीने आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनी व संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे. सुभाष देशमुख यांनी मार्च २००९ मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिला होता व अनिल पंधे यांच्या निधनानंतर त्यांचे नाव कारवाई करण्यात आलेल्या संचालकांच्या यादीतून वगळण्यास सेबीने मान्यता दिली.


काय आहे प्रकरण? 
भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ म्हणजेच सेबी. भांडवली बाजारात निधी उभारताना त्याच्या नियमांचे पालन करावे लागते. त्याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाईला सामाेरे जावे लागते. याच धर्तीवर लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. २००९ पासून १२ पर्यंत उभारण्यात आलेला निधी हा नियमांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे तो गुंतवणूकदारांना तीन महिन्यात विनाविलंब परत करावा लागेल.

 
पैसे परत करण्याची तयारी केलेली आहे 
याबाबत कंपनीचे संचालक शहाजी पवार यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, "गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली लागेल. याबाबत महेश देशमुख अधिक माहिती देऊ शकतील." श्री. महेश देशमुख यांना संपर्क साधला असता, त्यांनी मोबाइल घेतला नाही. 

बातम्या आणखी आहेत...