आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीविरोधातील तक्रारीची वेळीच दखल घेतली नाही: पवार यांची पंतप्रधानांवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- देशाची सर्वात मोठी लूट करणारा हिरे व्यापारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. वेळीच या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अशा प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या वेळी मोदी आडनावावरून देशाला मोदींनी छळलंय, अशी मिश्कील टिप्पणीदेखील त्यांनी केली.    


शनिवारी वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथील शेतकरी मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी उपस्थित होते.   


पवार म्हणाले, केंद्रात सत्तेमध्ये असलेली काही मंडळी हा घोटाळा यूपीए सरकारच्या काळात झाल्याचा कांगावा करत आहेत. हा आरोप चुकीचा आहे. नीरव मोदीने २०११ मध्ये बँकेत खाते उघडले. नंतर विश्वास संपादन करून त्याने हा घोटाळा केला. त्यामुळे यूपीएचा त्याच्याशी संबंध नाही. मुळात हा वर्ग भाजप सरकारचा समर्थक आहे. निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदींनी या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पाठिंबा द्या, तुम्हाला सहकार्य करू, असा शब्द दिला होता, असे पवार म्हणाले.   


दररोज भारतीय सैन्यातील जवान सीमेवर अतिरेक्यांशी लढताना शहीद होत आहेत. प्राणाची बाजी लावून हे सैनिक देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने सैन्याची अप्रतिष्ठा झाली आहे. आता सरकारने या संघवाल्यांना हातात काठी देऊन सीमेवर रक्षणासाठी पाठवावे. राज्यातील जनतेसाठी मंत्रालय हे आत्महत्येचे ठिकाण झाले आहे. सरकारकडून न्याय मिळत नसल्याने लोक मंत्रालयात आत्महत्या करून रोष व्यक्त करीत आहेत. सरकार यावर काहीच ठोस उपाय करीत नसल्याचा आरोप पवार यांनी या वेळी केला. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह समविचारी पक्षांची आघाडी होण्याच्या हालचालींना दिल्लीतून सुरुवात झाली आहे. आम्ही एकत्र लढू, असेही त्यांनी सांगितले.   

 

मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत  
यूपीए सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोगाच्या निम्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. यात राज्यांचा विचार घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना निवडणुका जाहीर झाल्या होत्या. आता आमचे सरकार नाही, पण भविष्यात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू, असेही पवार म्हणाले. आगामी राजस्थान, कर्नाटक आणि त्रिपुरा राज्यांतील निवडणुकांमध्ये जर भाजपचा पराभव झाला तर मोदी सरकार सत्तेच्या शेवटच्या दिवसांचा उपभोग घेईल. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत, असे पवार म्हणाले.

 

भिडे, एकबोटेंवरील   कारवाईबाबत साशंक   
सत्ताधारी ज्या लोकांचे पाय धरून दर्शन घेतात तेच लोक समाजात फूट पाडण्याचे, उपेक्षित घटकांवर अन्याय करण्याचे उद्योग करत आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ही तीच मंडळी आहेत. सरकार यांच्यावर कारवाई करेल याबाबत आपण साशंक आहोत, असेही पवार यांनी सांगितले.   

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...