आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज हे स्थितप्रज्ञ होते. कधी विजयाचा उन्माद केला नाही आणि पराभवाने खचले नाही. आयुष्यात अनेकदा बाका प्रसंग आला पण त्याने ते कधी गडबडले नाहीत. प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. व्यवस्थापनाचे गुण त्यांनी लहानपणीच अंगीकारले होते. त्यामुळेच ते जाणता राजा झाले, असे विचार प्रा. नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी प्रशाला येथे शिवछत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनोहर सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन कौशल्याबाबत बोलताना जाधव म्हणाले, महाराज सामान्य लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून असामान्य काम करवून घेत. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी व्यवस्थापनाचे तत्त्व पाळायला सुरुवात केली.
चार वेळेस आर्थिक टंचाई, तरी ते खचले नाहीत
१२ व्या वर्षात महाराजांच्या मंत्रिमंडळात आठ मंत्री होते. यात पेशवा, आमात्य, सेनापती, मंत्री, दानाध्यक्षांचा समावेश होतो. कोणत्या व्यक्तीने कोणते काम करायचे यांचे ते वाटप करायचे. यात ८ मंत्र्यांना आपले काम चांगल्या पद्धतीने करता यावे या करिता त्यांना मदत करण्यासाठी ६०० व्यक्तींची नेमणूक केली होती. यात चिटणीस, सबनीस आदींचा समावेश होत. तसेच महाराजांनी सामाजिक उत्तरदायित्वाचा देखील विभाग स्थापला होता. आज त्याला कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सबिलीटी असे म्हणतात. महाराज जरी गडावर नसायचे त्यावेळी देखील ती माणसे आपली कामे चोख बजावीत. महाराज जेव्हा ५० वर्षांचे झाले तेव्हा ते ३ लाख सैन्याचे नियोजन करत होते. त्यांच्या आयुष्यात चार वेळेस आर्थिक टंचाई आली. म्हणून ते खचले नाहीत. त्याच्यावर योग्य प्रकारे मात केली.
इतिहासाबद्दल अनास्था
आज आपल्याला शिवाजी महाराजांविषयी अत्यंत त्रोटक माहिती आहे. त्याचे कारण म्हणजे इतिहासाबद्दल असलेली प्रचंड अनास्था. आजची तरुणाई केवळ शिवाजी महाराजांसारखे दिसण्याचा प्रयत्न करते. शिवाजी महाराज सारखं बनण्याचा प्रयत्न करित नाही, असेही जाधव म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.