आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : जिल्ह्यामधील सहाजणांची पोलिस उपनिरीक्षकपदी वर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बुधवारी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात कोंढारपट्टा (नेवरे) ता. माळशिरस येथील अजीम खाजालाल शेख, कुगाव, ता. करमाळा येथील संतोष अर्जुन कामटे आणि माढा येथील सूरज शिवाजी राऊत यांनी यश मिळवले. उत्तर सोलापूर तालुक्यातील दोघे आणि माढा तालुक्यातील दोघांनी त्यात यश मिळवले. 


अकलूज । कोंढारपट्टा (नेवरे) येथील अजीम खाजालाल शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अजीम शेख हे संगणक अभियंता आहेत. त्यांनी कला शाखेची पदवीही घेतली आहे. त्यांचे नेवरे, शंकरनगर आणि पुण्यात शिक्षण झाले. पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर कोंढारपट्टा आनंदोत्सव साजरा झाला. खासदार विजयसिंह मोहिते, सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते, विश्वंभर भोसले, सरपंच अफसाना सलीम शेख आदींनी अभिनंदन केले. 


कंदर । कुगाव, ता. करमाळा येथील संतोष अर्जुन कामटे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातून कामटे हे एमपीएससीत ८४ च्या रँकने उत्तीर्ण झाले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुगाव, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चिखलठाण आणि उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय याठिकाणी झाले आहे. खासगी क्लास न लावता त्यांनी हे यश संपादित केले. 


माढा । सूरज शिवाजी राऊत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाले. एमपीएससीचा अंतिम निकाल बुधवारी लागला. या परीक्षेत राऊत यांनी यश मिळवले असून त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. एसपीएससी परीक्षेत त्यांनी ३४१ वी रँक मिळवली आहे. माढ्यात प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक बार्शीत झाले. नगरसेविका सुप्रिया बंडगर,शुक्रवार पेठ भजनी मंडळाने त्यांचे अभिनंदन केले. 


उत्तर सोलापूर । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत तालुक्यातील दोन शेतकरी पुत्रांनी बाजी मारली आहे. तालुक्यातील रानमसले गावच्या महेश नामदेव गरड व वडाळ्याच्या श्रीनिवास दत्तात्रय साठे या दोन युवकांनी यश मिळवले आहे. २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल बुधवारी रात्री संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत.  


पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलेल्या महेश गरड यांचे प्राथमिक शिक्षण रानमसले येथील जि.प. शाळेत झाले. हलाखीच्या परिस्थितीत महेश यांनी यश संपादित केले. परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. वडाळ्याच्या श्रीनिवास साठे यांचे शिक्षण जि. प. शाळा, न्यू हायस्कूल वडाळा येथे झाले. उच्च शिक्षण लोकमंगल कृषी महाविद्यालयात झाले. आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या श्रीनिवास यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वानी कौतुक केले.


कुर्डुवाडी । भोसरे येथील मनोज रामदास बागल यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य सुलन रामदास बागल यांचे ते चिरंजीव आहेत.

बातम्या आणखी आहेत...